तामिळनाडूतील अनेक मंदिरांमध्ये जीन्स पॅण्ट आणि स्कर्ट घातलेल्या भाविकांना आता प्रवेश करता येणार नाही. धार्मिक विभागाच्या अंतर्गत येणा-या सर्व मंदिरांमध्ये १ जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असा फतवाच राज्य सरकारच्या धार्मिक विभागाने काढला आहे. मात्र सरकारने काढलेल्या या परिपत्रकाला पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
तामिळनाडूतील प्रत्येक मंदिरात आधुनिक वस्त्रे परिधान करून येणा-यांना प्रवेश करता येणार नाही तसेच परंपरा आणि प्रथांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे परिपत्रकात म्हटले आहे. मात्र हा नियम नवीन नसल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.
यापूर्वीही धार्मिक विभागाच्या आयुक्तांनी अशा प्रकारचे परिपत्रक काढल्याचे सरकारी अधिका-यांनी म्हटले आहे. प्रत्येक देवस्थानाचे काही नियम आहेत. आणि त्यांचे पालनही केले जात आहे. महिलांनी मंदिरात साडी नेसणे अनिवार्य आहे. मात्र ही प्रथा मागे पडत असल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.