आजपासून मुंबईकरांसाठी डबेवाल्यांची खानावळ

आजपासून मुंबईकरांसाठी डबेवाल्यांची खानावळ

घडय़ाळाच्या काटय़ावर धावणा-या मुंबईकरांना वेळेअभावी सकाळी जेवणाचा डबा बनवणे शक्य होत नाही. त्यात मुंबईकरांची घरगुती जेवणाला अधिक पसंती असते. मुंबईकरांची ही गरज ओळखून डबेवाले सुभाष तळेकर आणि ‘हिरकणी महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थे’तर्फे नवीन खानावळ सुरू करण्यात आली आहे. डबेवाला संघटनेचे नेते मॅनेजमेंट गुरू गंगाराम तळेकर यांच्या २९ डिसेंबर रोजी असणा-या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ही खानावळ सुरू करण्यात येणार आहे.

नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन सावंत यांच्या हस्ते सोमवारी या खानावळचे उद्घाटन करण्यात आले. ही खानावळ परळ व्हिलेजमध्ये २९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कांचन दर्गे या खानावळीच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहतील. डबेवाल्यांचा सर्वागीण विकास व्हावा, या दृष्टीने गंगाराम तळेकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. डबेवाल्याच्या एकटय़ाच्या उत्पन्नातून घराचा आर्थिक भार उचलणे आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे उत्पन्नाचा पर्याय म्हणून स्वत:ची खानावळ सुरू करण्याचे ठरवले. यात ‘हिरकणी महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थे’चे सहकार्य लाभले असल्याचे, सुभाष तळेकर यांनी सांगितले. या खानावळचे वैशिष्टय़ म्हणजे खानावळीत सहभागी महिला डबेवाल्यांच्या कुटुंबातील असतील. शाकाहारी डबा ९५ रु., मांसाहारी डबा ११० रु. आणि डाएट पदार्थाचा डबा २५० रुपयांना असेल.

ऑर्डर सुरू

डबेवाले आणि महिला संस्था मिळून स्वत:ची खानावळ सुरू करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच याबाबत चौकशी सुरू झाली असून ऑर्डरही येऊ लागल्या आहेत. जोगेश्वरी, गोरेगाव, दक्षिण मुंबईतून ऑर्डर येणे सुरू झाले असल्याचे तळेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *