आंध्रप्रदेशातील ८ हजार किलोचा लाडू गिनीज बुकात

आंध्रप्रदेशातील ८ हजार किलोचा लाडू गिनीज बुकात

तपेश्वरम येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत साखरेच्या पाकापासून तयार केलेल्या ८ हजार किलोच्या लाडूची गिनीज बुकात नोंद झाली आहे. हा लाडू स्थानिक मिठाई विक्रेत्यांनी सलग पाचव्या वर्षी बनवला होता.

सलग पाच वर्ष ८ हजार किलोचा लाडू बनवण्याचा विक्रम आम्ही केला असून रविवारी सायंकाळी आम्हाला गिनीज बुकने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. गणरायाच्या आशिर्वादामुळे आणि आमच्या सहका-यांच्या अफाट मेहनतीमुळे आम्हाला या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे,असे तपेश्वरम मधील श्रीभक्त अंजनीया मिठाई दुकानाचे मालक सलादी व्यंकटेश्वर राव म्हणाले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार,आंध्रप्रदेशातील तपेश्वरम शहरातील अंजनीया मिठाई विक्रेत्याने जगातील सर्वाधिक वजनाचा लाडू बनवला आहे. हा लाडू ८,३६९ किलो वजनाचा असून तो व्यंकटेश्वर राव आणि त्यांच्या सहका-यांनी गणेशोत्सवादरम्यान म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी तयार केला होता. गणेशोत्सवादरम्यान विशाखापट्टणम येथे स्थापित केलेल्या गणेशमूर्तीसाठी राव आणि सहका-यांनी हा लाडू तयार केला होता.

‘गतवर्षी आम्ही दोन महालाडू तयार केले होते. त्या लाडूचे वजन ८ हजार किलो आणि ६ हजार किलो असे होते. हे दोन्ही लाडू आम्ही अनुक्रमे विशाखापट्टणम् आणि विजयवाडा येथे स्थापित केलेल्या गणेशमूर्तीना अर्पण केले’, असे राव म्हणाले.

२०११ पासून त्यांच्या महालाडूंची नोंद गिनीज बुकात होत आहे. २०११ मध्ये आम्ही ५,५७० किलोचा लाडू तयार करून गिनीज बुकात प्रवेश मिळवला होता. २०१२ मध्ये आम्ही लाडूचे वजन वाढवून ६,५९९ किलोचा लाडू तयार करण्याचा विक्रम केला होता. २०१३ मध्ये ७,१३२ किलोचा लाडू तयार केला होता तर २०१४ मध्ये यापूर्वीची सर्व विक्रम मोडीत काढून आम्ही ७,८५८ किलोचा लाडू तयार केला होता. ५०० किलोचा कोवा (दूधापासून तयार केलेला पदार्थ) शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अर्पण करायचा हे आमचे यापुढील लक्ष्य आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *