इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या हैदराबादच्या तीन तरुणांना नागपूर विमानतळावरून आज (शनिवार) सकाळी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी अटक केली.
एटीएसचे महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदारबादमधील हे तीन तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी अफगणिस्तानकडे जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर त्या तिघांना नागपूर विमानतळावरून अटक करण्यात आली असून, त्यांना हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हे तिन्ही तरुण अंतिम वर्षाचे शिक्षण घेतात. यातील दोघेजण तांत्रिक शिक्षण घेत होते. हे तिघेही गेल्या काही दिवसांपासून इसिसच्या संपर्कात होते. हैदराबादमधून यापूर्वी इसिसमध्ये जाणाऱ्या काही तरुणांना अटक करण्यात आल्याने त्यांनी नागपूरचा पर्याय निवडला होता. नागपूरमधून हे तिघेही श्रीनगरला जाणार होते. गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती एटीएसला दिल्यानंतर आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना सापळा रचून पकडण्यात आले.
या तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी तेलंगणमधील पोलिस ठाण्यांत हे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. एटीएसने या तिघांना तेलंगण पोलिसांच्या विशेष पथकाच्या ताब्यात दिले आहे. अब्दुल वसीम, उमर फारुखी आणि हसन फारुखी अशी या तीन तरुणांची नावे आहेत.