मोदींना नोबेल पुरस्काराचा डास चावला

मोदींना नोबेल पुरस्काराचा डास चावला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाहून परतताना अचानक पाकिस्तानला भेट दिली. यावरून देशात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असतानाच काँग्रेसने मोदींना जबरदस्त टोला लगावला आहे. मोदींनाही नोबेल पुरस्काराचा डास चावला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी दिली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना तो चावलेलाच होता. आता हा डास मोदींनाही चावला आहे, असे वाटते, असा हल्लाबोल तिवारी यांनी केला आहे.

पाकिस्तानचा दौरा पूर्वनियोजित होता की आकस्मिक ठरला, याबाबत मात्र गूढ कायमच आहे. मोदी-शरीफ यांच्या भेटीत काय झाले, हे राष्ट्राला त्यांनी सांगितलेच पाहिजे, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

मोदी रशियाला गेले तेव्हा त्यांच्या अफगाणिस्तान अथवा पाकिस्तान दौ-याबाबत काहीही सूतोवाच केले गेले नव्हते. अचानक मोदी पाकिस्तानला गेले व तेथे ते दोन तास ४० मिनिटे होते. त्यांच्या या दौ-याबाबतचा सस्पेन्स भाजपानेही कायम ठेवला आहे.

मात्र काँग्रेसच्या मते ही भेट आकस्मिक नव्हती. एका व्यावसायिकाचे पाकिस्तानात चांगले संबंध आहेत. त्यानेच मोदी यांची ही भेट ठरवली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केला. पाकिस्तानी माध्यमांनीही मोदी यांची भेट पूर्वनियोजितअसल्याचे सांगून काँग्रेसच्या आरोपाला बळकटी आणली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावरही तिवारी यांनी टीका केली आहे. रेडिओचा दुरुपयोग केला जात आहे, तो थांबवला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *