नायजेरियातील औद्योगिक वसाहतीतील चिकासन गॅस प्रकल्पात गॅस टँकर ट्रकमुळे गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत १०० हून अधिक जण ठार झाले. गॅस सिलिंडर गॅसने भरून घेण्यासाठी रांगेत उभे असलेले लोक त्यात ठार झाले. नैऋत्य नायजेरियातील नेवी या ख्रिश्चनबहूल वस्तीतील प्रकल्पात ही भीषण दुर्घटना घडली. ख्रिसमससाठी लोक मोठय़ा संख्येने सिलिंडरमध्ये गॅस भरून घेण्यासाठी आले होते.
अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणेपर्यंत शंभरहून अधिक कोळसा झालेले मृतदेह परिसरात पडले होते, असे वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शी इमेका पीटर्स यांनी सांगितले की, ताजा गॅस भरल्याचे काम संपल्यावर निर्धारित कुलिंग टाईम पूर्ण होण्याची वाट न पाहताच ट्रक परतला. त्यामुळे एखाद्या बॉम्बसारखा स्फोट होऊन संपूर्ण गॅस प्रकल्प आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला.
प्रकल्पातील सर्व गॅस सिलिंडरचे स्फोट झाले आणि काळ्या धुराने परिसर भरून गेला. ख्रिसमससाठी सिलिंडरमध्ये गॅस भरून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे असलेले बहुतेक ग्राहक यात ठार झाले, असे पीटर्स यांनी सांगितले. अनेक तास आग धुमसत होती आणि बहुतेक मृतदेह तसेच अत्यंत गंभीर दुखापती झालेल्यांना नामडी अझिकिवे विद्यापीठ टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक मृतदेह ओळखू न येण्यापलीकडे होरपळले आहेत, असे पीटर्स यांनी सांगितले. नायजेरियासाठी काळा ख्रिसमस ठरला.