पाकिस्तानकडून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात सोमवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर स्वयंचलित शस्त्रास्त्र आणि रॉकेटद्वारे शस्त्र डागून गोळीबार केला.

पुँछ जिल्ह्यातील कृष्णघाटी सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान अर्धा तास आणि पुन्हा पहाटे सहाच्या सुमारास गोळीबार केला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे सैन्याचे लेफ्टनंट कर्नल मनिष मेहता यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी सकाळी काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला होता. तर २५ मे रोजी या भागात घुसखोरांना रोखण्याच्या प्रयत्नात तीन जवान हुतात्मा झाले होते. तर एक दहशतवादी ठार झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *