नाताळच्या निमित्ताने शहरातील चर्च सजले

नाताळच्या निमित्ताने शहरातील चर्च सजले

मुंबापुरीच्या अनेकानेक वैशिष्टय़ांपैकी निरनिराळ्या धर्माची प्रार्थनास्थळे हेही एक वैशिष्ट्य आहे. सध्या नाताळचा उत्साह ठिकठिकाणी पहायला मिळत असल्याने शहर, परिसरातील चर्चच्या बाहेर गर्दी बघायला मिळत आहे. चर्चची सौंदर्यपूर्ण वास्तू, चर्चबाहेर असलेले चांदण्या, मेणबत्त्या, येशू ख्रिस्तांच्या जन्माचा रेडीमडे देखावा आदी वस्तूंचे स्टॉल्स पाहता अल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक चर्चला स्वत:चा इतिहास असून ख्रिस्ती बांधवांचे प्रत्येक चर्चसोबत वेगळे नाते जोडलेले आहे. चला तर मग नाताळच्या निमित्ताने शहरातील काही निवडक चर्चमध्ये फेरफटका मारुयात.

रंगीबेरंगी विविध आकाराच्या मेणबत्त्या, चांदण्या, विविध आकारातील कंदील, सोनेरी रंगाची घंटय़ांची माळ, येशू ख्रिस्ताच्या जन्माचे रेडीमेड देखावे, सँटाक्लॉजचे पुतळे, मुखवटे, बाहुल्या आदी साहित्याने बाजारपेठ सजल्या आहेत. पण सोबत शहरातील ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेले माऊंट मेरी चर्चही उजळले आहे. वांद्रेतील माऊंट मेरी चर्चला विशेष महत्त्व असल्याने डिसेंबर महिना सुरू होताच या ठिकाणी रेलचेल बघायला मिळते. लहान, मध्यम आणि मोठय़ा आकाराचे ख्रिसमस ट्री, सिरॅमिक बाहुल्या, चांदण्या, झालर, स्नो मॅन, घंटय़ा, एन्जल्स, बॉल, विविध आकारातील रंगीबेरंगी मेणबत्त्या, येशू ख्रिस्त जन्मसोहळ्याचे आकर्षक देखावे, चांदण्यांचे कंदील, शुभेच्छा कार्ड, सँटाक्लॉजची टोपी-हेअरबँड, चॉकलेट बॉक्स, ड्रम, मोजे, म्युझिकल सँटा आदी वस्तूंचे स्टॉल चर्चबाहेर लागलेले आहेत. माऊंट मेरी चर्चची वास्तू शंभर वर्षे जूनी आहे. मत माऊलीच्या जत्रेची भक्तगण ज्या प्रमाणे आतुरतेने वाट बघत असतात त्याचप्रमाणे नाताळ दरम्यानही प्रत्येक भक्तगण या चर्चला भेट देण्यासाठी आतुर असतो. चर्चच्या बाहेरील मेरीचा मोठा पुतळाही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नाताळ दरम्यान प्रत्येकजण मेरीच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या लावतात. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांना दिल्या जाणा-या शुभेच्छा, कॅरोल, जिंगल्स, धार्मिक गीतांच्या सूरांनी माऊंट मेरीचा परिसर गजबजतो. मध्यरात्री येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा ‘मास प्रेअर’ करत साजरा करतात. मग केक कापून ‘हॅप्पी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा, आलंगीन देत सेलिब्रेशन केले जाते. केक, पेस्ट्री, प्लम केक, पोर्क, वाईन आदी पारंपारिक खाद्यपदार्थ बनवले जातात. रात्री येशू ख्रिस्तजन्माचा सोहळा झाल्यानंतर सकाळी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन केले जाते आणि मग विविध कार्यक्रम पार पडतात.

सेंट फ्रान्सिस डिसेल्स चर्च

नालासोपारा पूर्व येथील ‘सेंट फ्रान्सिस डिसेल्स चर्च’ नाताळ सण साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहे. सेंट फ्रान्सिस डिसेल्स चर्च गेल्या १५ वर्षापासून नालासोपारा पूर्व येथील कॅथिलक बांधवांसाठी नाताळ सण साजरा करत आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त या चर्चमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. नालासोपारा येथील ख्रिस्ती बांधवांचे या चर्चसोबत आगळेवेगळे नाते आहे. प्रत्येक जाती-धर्मातील जवळ-जवळ दोन हजार ख्रिश्चन बांधव या चर्चमध्ये नाताळ सण साजरा करायला येतात. या चर्चच्या परिसरात ख्रिश्चन बांधवांचे १४ समुदाय आहेत. प्रत्येकजण आपाल्या परिने नाताळची तयारी करतो. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा उभारत, सजावट करत या ठिकाणी समूह गान केले जाते. नाताळच्या आदल्या दिवशी सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये एकत्र जमून मास प्रेअर करतात. लहान मुले, तरुण यावेळी नाताळ सणावर आधारित नाटके सादर करतात. त्यानंतर दहा वाजताही समूह प्रेअर केली जाते. दीड तासाची ही प्रेअर असते. त्यानंतर केक कापून एकमेकांना भरवत नाताळ साजरा केला जातो. नाताळच्या दिवशी सकाळी ७ वाजता कोकणी भाषेत आणि ८.३० वाजता इंग्रजी भाषेत प्रार्थना केली जाते. या दिवशी सजावट स्पर्धेचे, गायन-नृत्य स्पर्धेचे आयोजनही केले जाते. प्रत्येकजण दहा दहा मिनीटे सादरीकरण करते. शालेय विद्यार्थ्यांपासून तरुण मुले-मुली आणि विवाहित जोडपी या स्पर्धेत सहभागी होतात.

सेंट मिशेल चर्च

सोळाव्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या माहिम येथील ‘सेंट मिशेल चर्च’मध्ये यंदाचे आकर्षण आहे ‘थँक्स गिवींग ट्री’. एका वेगळ्या कल्पनेला घेऊन यंदाचे ख्रिसमस ट्री म्हणजेच ‘थँक्स गिवींग ट्री’ सजणार आहे. चर्चमध्ये प्रेअर करायला येणा-या ख्रिस्ती बांधवाना या ट्रीला लाल रंगाची रिबीन बांधण्याचे आवाहन यावेळी केले जाणार आहे. चांगल्या कामाबद्दल आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून ही लाल रंगांची रिबीन बांधून घेण्यात येत आहे. चर्चचे आकर्षण असणा-या या ट्रीची सजावटीची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू करण्यात आली आहे. येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळाही पाहण्याजोगा असतो. शहरातील विविध भागातून, विविध जाती-धर्माचे लोक रात्री ठिक १२ वाजता चर्चमध्ये जमतात. चांदण्या, कंदील, घरगुती कुकीज, केक, चॉकलेट आदी पारंपारिक गोडधोड पदार्थाचे स्टॉल्स चर्चबाहेर पहायला मिळत आहेत. २० डिसेंबर पासून ‘सेलिब्रेशन विक’ म्हणजेच विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या सप्ताहाचे आयोजन केले जाते. यामध्ये कॅरलसाठी आलेल्या कॅथलिक्सना चविष्ट नाश्टा दिला जातो. या चर्चमध्ये नऊ बुधवार प्रार्थना केल्याने मनातील इच्छा पुर्ण होते अशी कॅथलिक बांधवाची भावना आहे. त्यामुळे दर बुधावरी या चर्चमध्ये गर्दी पाहायला मिळेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *