पुण्यातील सेवासदन शाळेत विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

पुण्यातील सेवासदन शाळेत विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील नामवंत सेवासदन शाळेच्या वसतिगृहातील ५१ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याने रविवारी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सेवासदन वसतगृहात शनिवारी रात्री विद्यार्थिनींनी जेवण केल्यानंतर ५१ विद्यार्थिनींना रविवारी पहाटे उलटी-जुलाबचा त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने सहा रुग्णवाहिकांतून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

१६ मुलींना घोले रोडजवळ एम. जी. हॉस्पिटल, १८ मुलींना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काहींना पेरुगेट पोलीस चौकीजवळील गोरे रुग्णालय व मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्व विद्यार्थिनी १० ते २० वयोगटातील आहेत.

मुलींची स्थिती सध्या स्थिर आहे. रात्री मुलींना जेवणात गवारची भाजी, पोळी आणि वरण, भात दिला होता. पोलीस याबद्दल तपास करत आहेत.  सेवासदनच्या ट्रस्टी अश्विनी गानू यांनी सांगितले की, आमच्याकडे २०० मुली वसतिगृहात राहतात. रात्री जेवण करून या मुली झोपल्या होत्या. पहाटे तीन वाजता मुलींना त्रास होऊ लागला.

आम्ही रुग्णवाहिका आणि हॉस्पिटलमध्ये फोन करून तातडीने मुलींना हॉस्पिटलमध्ये भरती केले. काही मुलींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. काही मुलींना त्यांच्या पालकांसोबत घरी सोडले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी पोलिसांनी सेवासदन वसितगृहाची तपासणी केली. स्वयंपाकघरातील जेवणाचे नमुने घेतले आहेत. या प्रकरणाबद्दल वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडेही चौकशी करण्यात आली. केवळ मुलींना विषबाधा झाली होती. काही मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *