मुंबईत सध्या गुलाबी थंडी

मुंबईत सध्या गुलाबी थंडी

कायम उष्ण व दमट वातावरण असलेल्या मुंबईत सध्या गुलाबी थंडीने मुक्काम ठोकला आहे. यामुळे शहरात गारवा पसरला असून घरात अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर, कानटोप्या पुन्हा बाहेर काढल्या जात आहेत.

पहाटे, सायंकाळनंतर गारेगार वारे वाहत असून गुरुवारी उपनगरात १५.६ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली असता शुक्रवारी उपनगरात १४.१ अंश से. तापमानाची नोंद झाली. हे हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येते दोन-तीन दिवस थंडीचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

डिसेंबरच्या दुस-या आठवडय़ात थंडीने प्रवेश केला असून शहर-परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.

शहराच्या तुलनेत उपनगरात थंडीचा अधिक प्रभाव जाणवत असून आतापर्यंत किमान तापमानाचा पारा १७ ते १८ अंश से.पर्यंत स्थिरावला होता. गेल्या दोन तीन दिवसात किमान तापमानासह कमाल तापमानातही घसरण होत चालल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. थंडीचा प्रभाव पाहता घरातील, लोकलमधील पंखे आपसूकच बंद होत आहेत.

सर्दी-खोकल्यामुळे होणा-या त्रासातून क्षणभर विश्रांती घेण्यासाठी प्रत्येक जण गरमागरम चहा-कॉफीच्या टपरीवर गर्दी करत आहे. कुलाबा येथे कमाल ३१.२ अंश से., किमान १९.३ अंश से., ५८ टक्के आद्र्रता तर सांताक्रूझ येथे कमाल ३३.३ अंश से., किमान १४.१ अंश से. आणि ४५ टक्के आद्र्रतेची नोंद झाली.

राज्यात अहमदनगर, महाबळेश्वर, मालेगाव, जळगाव, नाशिक, पुणे, नांदेड या भागात किमान तापमानाचा पारा १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. शुक्रवारी नाशिक येथे १०.२ अंश से. किमान तापमानाची नोंद केली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *