CMच्या नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ, चार एटीएम फोडून २५ लाख लुटलेत

राज्याची उपराजधानी नागपुरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत चोरट्यांनी ४ एटीएमला लूटत २५ लाख लुटलेत.

या सर्व एटीएमवरील चोरीची पद्धत सारखीच असल्याचं समोर आले आहे. एटीएमच्या सीसीटीव्हीत एक व्यक्ती कैद झाली आहे. याच व्यक्तीनं आपल्या साथीदारांसह नागपुरातल्या ४ एटीएम केंद्रांवर हल्ला करत तब्बल २५लाख रुपये लुटलेत.

हिंगणा रोडवरच्या याच सेंट्रल बँकेच्या एटीएमला चोरट्यांनी टार्गेट केलं. अवघ्या २० मिनिटांत त्यांनी १७ लाख रुपये लुटलेत. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. पुरावे  नष्ट करण्यासाठी त्यांनी एटीएमला पेटवून दिलं.

१७ लाख लुटल्यानंतरही या चोरट्यांचं समाधान झालं नाही. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंडीकेट बँक आणि हिंगणा पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील यूको बँकेवर त्यांनी दरोडा टाकला. या दोन्ही एटीएममधून त्यांनी तब्बल ८ लाख लुटलेत. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा इंडिया वनच्या एटीएमकडे वळवला. मात्र बाहेरचे कॅमेरे फो़डण्यापलीकडे त्यांनी काही केलं नाही. गॅस कटरच्या मदतीनं मशीन कापत या चोरट्यांनी हा डल्ला मारला.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सध्या कडेकोट बंदोबस्त आहे. मात्र हे सुरक्षा कडे भेदत चोरट्यांनी एक-दोन नव्हे तर चार एटीएम लुटत नागपूर पोलिसांना आव्हान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *