बदलापूरचा सौरभ पाटणकर ठरला उत्कृष्ट युवा संशोधक

बदलापूरचा सौरभ पाटणकर ठरला उत्कृष्ट युवा संशोधक

बदलापूरातील सौरभ पाटणकर या पी. एच. डी. च्या विद्यार्थ्यांने रसायन शास्त्रात मोलाचे संशोधन केले आहे. ‘गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन’ या महागडय़ा इंधनाची अत्यंत कमी खर्चात निर्मिती त्याने केली असून याचे पेटंटही त्याने मिळवले आहे. सौरभला त्याच्या या संशोधनासाठी त्याला नुकताच ग्रीन केमिस्ट्री फाऊंडेशनतर्फे उत्कृष्ट संशोधकाचा पुरस्कारही मिळाला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या आपल्या पुढील शिक्षणासाठी तो कॅनडाला रवाना झाला आहे.

बदलापूर पूर्वेला राहणा-या सौरभने कात्रप विद्यालयात शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर चांदीबाई कॉलेजमध्ये ११ वी व १२ वी आणि डोंबिवलीच्या जोंधळे महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पी. एच. डी. करताना सौरभने भविष्यातील जैव इंधनाला पर्याय ठरणा-या ‘गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन’ या इंधनाच्या निर्मितीवर संशोधन केले. या इंधनाच्या निर्मितीसाठी सध्या किमान १५० डॉलर प्रति बॅरल खर्च येत असल्याने त्याची किंमत न परवडणारी आहे. मात्र, मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिस्ट्रीमध्ये पी. एच. डी. दरम्यान सौरभने यावर संशोधन करत अवघ्या ५० डॉलर प्रति बॅरल खर्चात या इंधनाची निर्मिती शक्य करुन दाखवली.

हे इंधन पेट्रोल व डीझेलला पर्याय असून त्रूामुळे सौरभच्या या संशोधनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच ग्रीन केमिस्ट्री फाऊंडेशनतर्फे त्याला भारतातील उत्कृष्ट युवा संशोधक म्हणून ‘इंडस्ट्रीयल ग्रीन केमिस्ट्री वर्ल्ड २०१५’ हा पुरस्कारही देण्यात आला. अमेरीकन केमिकल जर्नल या मासिकात सौरभचा प्रबंधही प्रकाशित झाला आहे.

या यशात आई-वडिलांसह इन्स्टिटय़ूट ऑफ केमिस्ट्रीमधील त्याचे प्राध्यापक गणपती यादव यांनी केलेल्या मार्गदर्शनाचाही मोलाचा वाटा असल्याचे सौरभने सांगितले. सौरभला पुढील संशोधनासाठी ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली असून तो त्यासाठी नुकताच कॅनडाला रवानाही झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *