नागपूरमध्ये अज्ञात चोरट्यांनी तीन एटीएम मशीन फोडून सुमारे २५ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या वेळेस घडली. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पहिली घटना नागपूरमधील वाडी खडगाव रोडवर घडली. येथे असलेल्या सिंडीकेट बँकेमध्ये चोरी झाली. या एटीएमला गॅस कटरने कापून त्यामधून दोन लाख ८३ हजारांची रक्कम चोरट्यांनी चोरी केली.
दुस-या घटनेमध्ये वानाडोंगरी येथील सेंट्रल बँकेच्या एटीएममधून १७ लाख रुपये चोरले आणि तिस-या घटनेत हिंगण्या परिसरातील युको बँकेचे एटीएम फोडले असून त्यामधून चार लाख ७१ हजारांची रोकड चोरांनी लंपास केली.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू असून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. या तिन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने पुन्हा एकदा नागपूरमधील सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.