गोमुख ते हरिद्वार या परिसरात कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकला बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित गंगा लवादाने हा निर्णय घेतला असून येत्या १ फेब्रुवारीपासून तो अंमलात येईल. हॉटेल, धर्मशाळा आणि आश्रमांनी याचा भंग केल्यास पाच हजार रुपयांचा दंड केला जाईल. हरित गंगा लवादाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांनी ही घोषणा केली.
प्लॅस्टिकचा कचरा गोळा होऊन गंगा नदीत कमालीचे प्रदूषण होत असल्याने प्लॅस्टिक बंदी आवश्यकच होती. गंगेच्या स्वच्छतेचे काम लवादाने विविध टप्प्यांत विभागले असून गोमुख ते हरिद्वार, हरिद्वार ते कानपूर, कानपूर ते उत्तर प्रदेशच्या सीमा आदींचा त्यात समावेश आहे. प्लॅस्टिकशिवाय गंगेमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा, बांधकामाचे डेब्रिज टाकण्यास हरित लवादाने मनाई केली आहे. कोणत्याही जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, ग्लासेस, चमचे, डबे आणि अन्य वस्तुंना या परिसरात संपूर्ण बंदी असेल.
उत्तराखंड पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय सुरू असलेले प्रदूषणकारी उद्योग तातडीने बंद केले जातील, असेही लवादाने जाहीर केले आहे. गंगा खो-यातील खाणकामा्ंसंदर्भात लवादाने उच्च स्तरावरील नियमनाद्वारे व कडक देखरेखीखालीच ते सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे.