देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक अशी ख्याती असलेल्या मुंंबईतील सिद्धीविनायक देवस्थानने केंद्र सरकारच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये तब्बल ४० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीतून सिद्धीविनायक देवस्थानला वर्षाकाठी ६९ लाख रुपये निव्वळ व्याजापोटी मिळणार आहेत.
केंद्राने मोठा गाजावाजा करत गोल्ड मॉनिटायझेशन योजना आणली. मात्र या योजनेला हवातसा प्रतिसाद मिळाला नाही. सिद्धीविनायक देवस्थानने केलेल्या गुंतवणुकीमुळे केंद्राला दिलासा मिळाला आहे. ट्रस्टच्या ४० किलो सोने गुंतवणुकीच्या निर्णयामुळे योजनेला मोठा हातभार लागला आहे. ट्रस्टचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सिध्दीविनायक देवस्थानच्या पावलावर पाऊल ठेवत शिर्डी आणि तिरुपतीसह उर्वरित श्रीमंत देवस्थानेही योजनेत सोने गुंतवणुकीसाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. यासंबंधी ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, योजनेसाठीचे ४० किलो सोने लवकरच रिझर्व्ह बँकेकडे पाठविले जाणार आहे. त्यानंतर त्या सोन्याची बिस्किटे बनविली जातील. हे सोने वितळल्यानंतर ते साधारणत: ३० किलो शुद्ध सोने होईल. सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत सुमारे साडेसात कोटी होईल. या सोन्यावर २ ते २.५ टक्के व्याजानुसार ट्रस्टला केंद्र्राकडून दरवर्षी ६९ लाख रुपये व्याज मिळणार आहे.
सिध्दीविनायक ट्रस्टकडे सुमारे १६५ किलो सोने आहे. त्यापैकी ट्रस्टने १० किलो सोने वर्षासाठी एक टक्के व्याजदराने स्टेट बँकेत जमा केले आहे. या सोन्यावर ट्रस्टला प्रतिवर्षी १.९ लाख रुपये व्याज प्राप्त होते. मात्र या योजनेपेक्षा केंद्राची योजना अधिक चांगली आहे. त्यामुळे नव्या गोल्ड स्किममध्ये सोने गुंतवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.