कठीण काळात धर्म, जाती या सर्वांच्या सीमा तोडून लोक मदतीला येतात. असेच काही चेन्नईतील भीषण पुराच्या काळातही पहायला मिळत आहे.
पुरानंतर पाणी ओसरण्यास सुरवात झाल्यानंतर चेन्नईतील जमात-ए-इस्लामी हिंद या स्वयंसेवी संघटनेने मशीदीसह मंदिरांची साफसफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या संघटनेने कोट्टुपुरम आणि सेडापट भागातील दोन मंदिरांची साफसफाई केली आहे.
या स्वयंसेवी संघटनेतील एक विद्यार्थी पीर मोहम्मद याने सांगितले, की पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या या भागातील मशीद व मंदिरांची साफसफाई आम्ही करत आहोत. पुढील आठवड्यात आम्ही शहरातील आणखी काही भागांची साफसफाई करणार आहोत. नागरिकांची मदत करुन आम्हाला खूप समाधान वाटत आहे.