चुलत बहिणीच्या लग्नात पतीकडून अपमान; डॉ मनिषा जेजुरकर यांनी जीव दिला नव्हे, हत्येचा संशय; हायकोर्टाच्या निरीक्षणाने मृत्यू प्रकरणात ट्विस्ट

पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर यांना जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका असलेला जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मानसोपचार तज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर याचा पाय आणखी खोलात गेला आहे. संबंधित घटना केवळ जीव देण्यास प्रवृत्त केल्याची नसून हत्येचा संशय व्यक्त होत असल्याचे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यासह डॉ. नीलेश याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्याला गंगापूर पोलिसांमार्फत अटक होण्याची शक्यता आहे.

मानसोपचार तज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश जेजुरकर हा ९ मार्चपासून नाशिक शहरातून पसार होता. काही महिन्यांपासून तो पुन्हा शासकीय सेवेत रूजू झाला असून पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर यांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा (वय ४०) यांनी गळफास घेत आयुष्याची अखेर केली होती. या घटनेनंतर त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

या प्रकरणात नाशिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नीलेशने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा अर्ज न्यायाधीश माधव जामदार यांनी फेटाळला आहे. अर्जात कोणतेही तथ्य किंवा आधार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जेजुरकरच्या वकिलांनी संबंधित आदेशाला स्थगिती देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. परंतु, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने ही विनंतीदेखील फेटाळली आहे. बचाव पक्षामार्फत ॲड. अनिकेत निकम, अभिलाषा पवार, शासनामार्फत सरकारी अभियोक्ता स्वप्निल वाळवे, मूळ फिर्यादीमार्फत ॲड. अभयसिंह भोसले, अंकुर पहाडे, संजय कोकणे यांनी युक्तिवाद केला.

शवविच्छेदनात फेरफार केल्याचा संशय

जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी संशयिताचे थेट किंवा अप्रत्यक्ष असे कृत्य असणे आवश्यक आहे, ज्यामुळे मृत व्यक्तीला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केले गेले. संशयिताचा हेतू मृत व्यक्तीला मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडण्याचाच होता, हे स्पष्ट सिद्ध झाले पाहिजे. केवळ त्रास दिल्याच्या आरोपांवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरवता येत नाही. या घटनेच्या अगदी जवळच्या काळात असे कोणतेही कृत्य घडलेले नाही, जे थेट जीव देण्यास कारणीभूत ठरेल. डॉ. नीलेश हे मानसोपचार तज्ज्ञ असून, त्यांना दोन मुली आहेत आणि त्यांची पत्नी मृत झाली आहे’ असा युक्तिवाद डॉ. नीलेश यांच्या वकिलांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *