देशसेवेच्या स्वप्नाने सैन्यात भरती, २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराने अकस्मात आयुष्य संपवलं, नाशकात खळबळ

 भारतीय सैन्य दलात नुकत्याच भरती झालेल्या २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराने नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरच्या बॅरेकमध्ये आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विन एम . (वय २०, मूळ रा. केरळ) असे मृत अग्निवीराचे नाव आहे. त्याचे सहा महिन्यांपैकी दहा आठवडे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. धक्कादायक निर्णयामागील कारण अद्याप अस्पष्ट असून उपनगर पोलिसांत याबाबत आकस्मिक मृत्यू नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

आर्मी बॅरेकमध्ये आयुष्याची अखेर

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १०) सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी आर्टिलरी सेंटरमधील अशोक चक्र गेटजवळील आर्मी बॅरेकमध्ये अश्विनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच त्याच्या लष्करी सहकाऱ्यांनी तातडीने त्याला खाली उतरवले. त्याला उपचारांसाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी तपासून त्याला मृत घोषित केले

चिठ्ठी सापडली नाही

घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासात बॉडीजवळ कोणतीही मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. या प्रकरणी सागर पुंजाराम मुतकुठे यांनी दिलेल्या माहितीवरून उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अश्विन हा मूळचा केरळचा रहिवासी असून, देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून तो अग्निवीर म्हणून सैन्य दलात दाखल झाला होता. प्रशिक्षणाच्या काळातच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याचे सहकाऱ्यांसह प्रशिक्षकांनी शोक व्यक्त केला.

घटनेची माहिती केरळ येथील त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, ते नाशिककडे रवाना झाले आहेत. शवविच्छेदन अहवाल, पोलिस तपास आणि लष्करी पातळीवरील प्राथमिक माहिती यानंतरच अश्विनच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान त्याच्यावर कोणता मानसिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक तणाव होता का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. सध्या आत्महत्येमागील ठोस कारण समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *