पुण्यात खासगी कंपनीला धमकावून ५ कोटींच्या खंडणीची मागणी; २५ लाख घ्यायला गेले अन् अलगद अडकले, चौघांना अटक

औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि विविध आस्थापनांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. खंडणीखोरीविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्यात आले असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणतीही सहानुभूती अथवा सहनशीलता दाखवली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विणयकुमार चौबे यांनी दिला आहे. एमआयडीसी भोसरी परिसरातील एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला धमकावून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी २५ लाख रुपये स्वीकारणाऱ्या चार आरोपींना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणाऱ्यांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एम.आय.डी.सी परिसरातील एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला आरोपींनी कंपनीची कागदपत्रे काढल्याचे सांगत धमकावले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर खंडणीच्या रकमेपैकी २५ लाख रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी आले असता पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ४३), रमेश भिमा मांजरेकर (वय ३९) आणि सुनील राजेंद्र कानू (वय ३४) यांचा समावेश आहे. यातील आरोपी सुनील कानू याच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर खंडणीच्या रकमेबाबत अधिक तपास करण्यात आला. या प्रकरणातील इतर आरोपींची भूमिका तसेच खंडणीच्या कटामागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *