तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला, संतापलेल्या तरुणाने मेडीकलमध्ये भावाला संपवलं; छ.संभाजीनगरमधील प्रकरणाचं कारण समोर

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग मनात धरून गुन्हेगाराने दुकानात घुसून मुलीच्या 22 वर्षीय भावाच्या पोटात चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हर्सूल परिसरातील कोळठाणवाडी रस्त्यावर काल शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा रक्ताळलेला थरार घडला. या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या 9 तासांच्या आत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला सावंगी-फुलंब्री परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

शेख मोहम्मद फैजल अब्दुल कादर(वय 22, रा. उमर कॉलनी, हर्सूल) असं मृत मेडीकल चालकाचं नाव आहे. या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी मुख्य आरोपी रेहान अमीन पटेल (वय 25, रा. करीमनगर, हर्सूल) आणि त्याचा साथीदार समीर रईस शेख (वय 22, रा. हर्सूल) या दोघांना अटक केली आहे. मयत फैजलचा मोठा भाऊ शेख मुस्ताकीम याच्या फिर्यादीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा धरला होता राग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी मुख्य आरोपी रेहान याच्या कुटुंबाने फैजलच्या धाकट्या बहिणीसाठी लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिचं लग्न आधीच दुसऱ्या ठिकाणी ठरलं असल्याने फैजलच्या कुटुंबाने हा प्रस्ताव नाकारला. या गोष्टीचा राग मनात धरून गुंड प्रवृत्तीचा असलेला रेहान फैजलच्या कुटुंबाला सतत त्रास देत होता. घरासमोरून व दुकानासमोरून मोठ्या आवाजात बुलेट पळवणे, आरडाओरड करणे आणि रस्त्यात खुन्नस देऊन धमकावणे असे प्रकार तो करत होता.

​कुराण पठण करत असताना हल्ला; पोलिसांची ९ तासांत धडक कारवाई

तीन दिवसांपूर्वीच रेहानने फैजलचे दुकान जाळल्याचा संशय होता. काल शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास फैजल दुकानात शांतपणे कुराण पठण करत बसलेला असताना रेहान आणि समीरने आत घुसून त्याला बाहेर ओढलं. त्यानंतर रेहानने धारदार चाकू फैजलच्या पोटात खोलवर खुपसला. वार इतका भीषण होता की, चाकू पोटातच सोडून आरोपी पसार झाले. उपचारापूर्वीच फैजलचा मृत्यू झाला. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपींचा माग काढत हर्सूल पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून सावंगी-फुलंब्री परिसरातून दोघांना अवघ्या 9 तासांत गजाआड केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *