सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तीन शेतक-यांनी आपली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अकोल्यातील संतोष गवळी या तरुणाची श्रीलंकेत किडनी काढून विकल्याची घटना बुधवारी उजेडात आली. त्यानंतर आणखी दोघांबाबत असे घडल्याचे समोर आल्याने किडनी विक्रीची जागतिक टोळी या मागे असावी, हा पोलिसांचा संशय बळावला आहे.
सात-आठ महिन्यांपूर्वी अकोल्याच्या संतोषने आनंद जाधव या व्यक्तीकडून २० हजार रुपये उधार घेतले होते. हप्त्याने ते फेडणे त्याला कठीण झाले तेव्हा आनंद जाधव याने त्याला कर्ज फेडायचा सोपा मार्ग सांगितला. कर्जमुक्तीच्या आशेने संतोष तयार झाला. तेव्हा आनंदने त्याची गाठ देवेंद्र शिरसाट नावाच्या व्यक्तीशी घालून दिली.
देवेंद्र त्याला नागपूरला एका खासगी दवाखान्यात घेऊन गेला. इथे एका मध्यस्थाच्या मार्फत एका दलालाशी चार लाख रुपयांत सौदा ठरला. त्यानंतर १५ दिवसांनी त्याला कोलंबो येथे नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, नंतर त्याच्या हाती केवळ तीन लाख रुपये ठेवण्यात आले. त्यामुळे संतोषने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी या प्रकरणी शिरसाट आणि आनंद जाधव यांना ताब्यात घेतले. तपासात आणखी दोन प्रकरणे उजेडात आली. यातली एक व्यक्ती महिला आहे. शांताबाई खरात नावाच्या महिलेवर ३० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यांना चार लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. पण फक्त दोन लाख रुपयेच मिळाले.
देवानंद कोमलकर याच्यावर एक लाख रुपयाचे कर्ज होते. त्याला आठ लाख देण्याचे कबूल केले होते. पण निम्मेच पैसे दिले. या दोघांच्या शस्त्रक्रिया मराठवाडयात केल्याची माहिती आहे. या टोळीने आणखीही काही लोकांना फसवले असण्याचा संशय असून पोलिसांनी तपास वाढवला आहे.