भारतावर हल्ला करण्याची इसिसची धमकी

भारतावर हल्ला करण्याची इसिसची धमकी

आपल्या क्रूर व नृशंस कारवायांनी सीरिया व इराकमध्ये थैमान घालणा-या ‘इसिस’ने थेट भारताला लक्ष्य करण्याची धमकी दिली असून भारतातील मुस्लीम संकटात असल्याचा जावईशोध लावला आहे.  पॅरिस हल्ल्यानंतर भारतासह इतर देशांमध्ये घातपात पसरवणार असल्याचा दावा ‘इसिस’ने केला आहे.

‘इसिस’ने ‘ब्लॅक फ्लॅग फ्रॉम द इस्लामिक स्टेट’ (२०१६) या नावाचे ई-बुक नेटवर प्रसिद्ध केले आहे.  १३० पानांच्या या बुकमध्ये त्यांनी जगभरात आपल्या कारवाया वाढवण्याचा इशारा दिला आहे. आधुनिक जिहादचा इतिहास यात मांडला आहे.

जगभरातील मुस्लिमांना चुचकारताना ‘इसिस’ने सांगितले की, मुस्लीम अल्पसंख्य असलेल्या देशातील मुस्लीम धर्मीयांना सावधतेचा इशारा दिला आहे. इसिसच्या आगमनामुळे मुस्लीम अल्पसंख्याक देशातील मुस्लिमांना शत्रू समजण्याची शक्यता आहे.

जर्मनीतील ‘नाझी’, फ्रान्समधील ‘यूकेआयपी’ राजकीय गटांप्रमाणेच भारतात हिंदू गट प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. भारतातील हे हिंदू गट बीफ खाणाऱ्या मुस्लिमांना ठार करतील. यासाठी त्यांनी दादरी येथे गोमांस खाण्याच्या अफवेवरून मुस्लीम मोहम्मद इकलाख या तरुणाच्या हत्येचा हवाला ‘इसिस’ने दिला. मुस्लीमविरोधकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न  संबंधित हिंदू गटांकडून होत आहेत. यांचा वापर भविष्यातील युद्धात केला जाऊ शकतो, अशी चिथावणी ‘इसिस’ने दिली.

भारतातील राजकीय परिस्थितीचे विेषण ‘इसिस’ने केले आहे. पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख आपल्या ई-बुकमध्ये केला आहे. मात्र त्यांचा उल्लेख पंतप्रधानांऐवजी राष्ट्राध्यक्ष केला आहे. मुस्लीम हे जिहादमध्ये सहभागी होत असल्याचा जागतिक प्रचार हिंदू गट करत आहेत. हे गट शस्त्रास्त्र, स्फोटके गोळा करत आहेत.

येत्या काही वर्षात हे गट मुस्लिमांच्या विरोधात कारवाया सुरू करतील, असा कांगावा केला आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या देशात मुस्लीम अल्पसंख्य असून तेथे त्यांच्या मनात बहुसंख्याकडून भीतीचे वातावरण पसरवले जात आहे.

तुम्हाला तेथील राजकर्ते चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करतील. तसेच आर्थिक अडचणीत असतानाही ते मुस्लीम दहशतवाद्यांना रोखण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करतील, असे इसिसने आपल्या ‘ई-बुक’मध्ये नमूद केले.

उजव्या विचारसरणीचे गट मुस्लिमांवर हुकूमत गाजवतील. त्यावेळी सरकार व पोलीसही त्यांच्या मदतीला धावणार नाहीत. त्यामुळे मुस्लीम धर्मीयांनी मुस्लीम देशांमध्ये आश्रय घ्यावा किंवा जिहादमध्ये सहभागी व्हावे, अशा शब्दांत मुस्लीम अल्पसंख्य असलेल्या देशातील मुस्लीम धर्मीयांना इशारा देताना ‘इसिस’ने चुचकारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *