ड्रग माफिया शशिकला उर्फ बेबी पाटणकरप्रकरणात बड्या पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
क्राईम ब्रांचने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास गोखले, पोलिस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक ज्योतीराम माने, हेड कॉन्स्टेबर यशवंत पार्टे यांना जेरबंद करण्यात आलं आहे. हे सर्व आझाद मैदान पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील आहेत.
या बड्या पोलिस अधिकाऱ्यांनी बेबी पाटणकरला मदत केल्याचा आरोप आहे.
काही महिन्यांपूर्वी मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकात पोलिस धर्मराज काळोखे याच्या लॉकरमधून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर काळोखे यांच्या घरातूनही अमली पदार्थांचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला होता.
हे ड्रग्स बेबी पाटणकर या महिलेनं पुरवल्याचा आऱोप आहे त्यासंदर्भात 22 एप्रिलला बेबी पाटणकरला अटक करण्यात आली होती. बेबीच्या ड्रग्ज धंद्यात पोलिसांचा हात असल्याचा संशय होता. त्यावरून पोलिसांची झाडाझडती सुरू आहे.
कोण आहे बेबी पाटणकर?
शशिकला ऊर्फ बेबी रमेश पाटणकर ही पूर्वी दूधविक्री करायची. मात्र ती या व्यवसायातून ड्रग्ज धंद्यात घुसली. यातून पैसा मिळायला लागल्यावर, तीचं कुटुंबच या धंद्यात तिला मदत करू लागलं. बेबीने मुंबईल्या महाविद्यालयांबाहेर ड्रग्ज विक्रीचा धंदा सुरू केला आणि त्यात जम बसवला.
यामध्ये तिने काही पोलिसांनाही हाताशी धरलं. यामध्ये धर्मराज काळोखेचं नाव होतं. तो बेबीला मदत करायचा. मात्र यादरम्यान तीने पोलिसांनाही गुंगारा देत, चक्क पोलिसांची खबरी म्हणूनही काम केलं. पण या दरम्यान तिचा ड्रग्ज धंदा सुरूच होता. अखेर तिला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली.