सीमा लढयातील हुतात्म्यांचे स्मारक बारगळले

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद उफाळला असताना शिवसेनेने जाहीर केलेल्या संयुक्त महाराष्ट्र सीमा लढयातील हुतात्म्यांचे स्मारकही बारगळले आहे. परळ-भोईवाडा येथील ‘बॉम्बे डाईंग मिल’च्या जागेचा सीमा लढयातील हुतात्म्यांचे स्मारक बनवण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून त्याचे भूमिपूजनही थाटामाटात पार पडले.

आता तेथे स्मारक उभारणीचा प्रस्ताव रद्द झाला असून तेथे उद्यानाचा घाट घालण्यात येत आहे. ही बाब उघड होताच सत्ताधारी शिवसेनेच्या तंबूत धावपळ उडाली आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करून हुतात्मा स्मारकाचा उद्यानात समावेश करण्याची मागणी केली आहे.

परळ-भोईवाडा बॉम्बे डाईंग मिलच्या एकूण जागेपैकी ३२ हजार ८२७ चौरस मीटरची जागा पालिकेच्या ताब्यात आली. त्या जागेवर पालिकेने उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदारांची निवड झाली आहे. या उद्यानाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांनी करून येथे सीमा लढयातील हुतात्म्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात हे काम सुरू झाले तरी हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी मुहूर्त सापडत नाही.

फ्लोरा फाऊंटन येथील हुतात्मा स्मारकाच्या धर्तीवर हे स्मारक उभारण्याचा मानस होता. पण, सध्या केवळ उद्यानाचे काम सुरू आहे. महापौर स्नेहल आंबेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी स्मारकाचे बांधकाम केले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सत्ताधा-यांची धावपळ सुरू झाली आहे.

स्थायी समिती अध्यक्षांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्रव्यहार करून हुतात्मा स्मारक, खुली व्यायामशाळा, वटवृक्ष व सुगंधी फुलझाडांची लागवड व येथे उभारण्यात येणाऱ्या कारंजात रंगीबेरंगी दिवे बसवणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करणे आदी कामांची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *