१०४२ हि-यांच्या दर्जातील फसवणूक उघड

१०४२ हि-यांच्या दर्जातील फसवणूक उघड

सुमारे १०४२ हि-यांचे रंग आणि स्पष्टता यांच्यात फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर जेमोलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ अमेरिका (जीआयए)ने त्यांचे ग्रेडिंग रद्द केल्याचा अहवाल दिला आहे. याप्रकरणी टीसीएसच्या दोन कर्मचा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषद (जीजेईपीसी) आणि भारत डायमंड बाऊर्स (बीडीबी) यांनी संयुक्त स्थायी समितीची स्थापना केली आहे.

जीआयएने दर्जात फसवणूक करणा-या क्लायंटची (ग्राहक) यादी प्रसिद्ध करतानाच त्यांची खाती निलंबित केली आहेत. गेल्या महिन्यामध्ये जीआयएच्या माहितीत हेराफेरी करून डायमंड ग्रेडिंग रिपोर्ट बदलण्यात आल्याचे प्रकरण उघड झाले होते. यामध्ये देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसचे (टीसीएस) दोन कर्मचा-यांना पोलीस कोठडी देण्यात आली. टीसीएसकडून जीआयएला डेटाबेस सव्‍‌र्हिस दिली जाते.

अंतर्गत दर्जा नियंत्रण तपासणीत ग्रेडिंगविषयी माहितीत काही विसंगती आढळल्यानंतर ही फसवणूक समोर आली. यानंतर टीसीएससह जीआयएने चौकशी सुरू केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जीजेईपीसी आणि भारत

डायमंड बाऊर्सने संयुक्तपणे स्थायी स्थापून यात लक्ष घालण्याचा निर्णय घेऊन चौकशी सुरू केली आहे.  जीआयए आणि टीसीएसच्या चौकशीतून या घोटाळय़ात टीसीएसचे सध्याचे आणि माजी कर्मचारी गुंतल्याचे समोर आले आहे. त्यांनी विशिष्ट क्लायंटसाठी हे काम केले आहे.

फसवणूक झालेल्या १०४२ हि-यांची यादी जीआयएच्या वेबसाईटवर क्रमांकासह उपलब्ध आहे. तसेच रद्दबातल ठरवण्यात आलेल्या ग्रेडिंगची तारीख, क्लायंट अकाऊंटचे नाव, प्रत्येक हि-याचा आकार आणि वजन याचीही माहिती देण्यात आली आहे.

स्थायी समितीकडून फसवणूक प्रकरणातील गुंतागुंत उलगडण्या वैयक्तिकरीत्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याबरोबरच जीआयए आणि टीसीएसच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबरही व्यापक चर्चा चर्चा सुरू आहे. – प्रवीणशंकर पांडय़ा, अध्यक्ष, जीजेईपीसी

पोलीस तपास करत असून त्यातून काय निष्पन्न होते याची प्रतीक्षा आहे. मात्र हे प्रकरण खूप गंभीर आहे. यामध्ये या उद्योगातील सदस्य दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. – अनुप मेहता, अध्यक्ष, भारत डायमंड बाऊर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *