व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने ग्रुप मेंबर्सनी थेट अॅडमिनवरच चाकूहल्ला केला. या हल्ल्यात ग्रुप अॅडमिन बंटी कुर्सिजा जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना उल्हानगरमध्ये घडली.
याप्रकरणी अनिल मुखी आणि नरेश रोहरा यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
बंटी कुर्सिजाने व्हॉट्सअपवर ‘जय हो’ नावाचा ग्रुप तयार केला होता. बंटीने या ग्रुपमध्ये अनिल मुखी आणि नरेश रोहरा यांना अॅड केलं होतं. मात्र हे दोघे ग्रुपवर अश्लिल मेसेज, फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याच्या रागातून, बंटीने या दोघांची ग्रुपमधून हकालपट्टी केली. त्यापूर्वी बंटीने या दोघांना असे मॅसेज पाठवू नका, असं वारंवार सांगितलं होतं. पण त्यांनी असे मॅसेज पाठवणं सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे बंटीने त्यांना ग्रुपमधून काढून टाकलं.
ग्रुपमधून काढून टाकल्याचा राग
बंटीने अनिल आणि नरेश यांना ग्रुपमधून काढून टाकल्याने, त्यांचा पारा चढला. त्यांनी बंटीला वारंवार धमकीही दिली. त्यातच अनिलने जुना वाद उकरून काढला. या वादाचा पर्यवसन पुढे मारहाण आणि चाकूहल्ल्यात झाला. अनिल आणि नरेश यांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने बंटीवर चाकूहल्ला केला. यात बंटी जखमी झाला.
या प्रकरणी पोलिसांनी हिल- लाईन पोलिसांनी अनिल मुखी, नरेश रोहरा यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.