कुपवाडामधील तंगधर सेक्टरमध्ये लष्कराच्या छावणीवर आत्मघातकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बुधवारी एक लष्करी अधिकारी आणि एक नागरिक मृत्युमुखी पडले. एकूण तीन दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आले असून त्यांनी तंगधरमधील लष्कराच्या छावणीवर हल्ला केला, असे लष्कराचे तंगधरमधील प्रवक्ते एजाज अहमद यांनी सांगितले.
हल्लेखोर दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात दारूगोळा असून त्यांनी हल्ला करताना ग्रेनेडचा मोठ्या प्रमाणात वापर केला. हल्लेखोरांना लष्कराकडून लगेचच प्रत्युत्तर देण्यात आले असून, अजूनही तंगधरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबाराचे आवाज येत आहेत. यापूर्वीही तंगधरमधून भारतामध्ये घुसखोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी लष्कराच्या जवानांकडून सातत्याने गस्त घातली जाते. दरम्यान, पूंछ जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर लष्कराने कारवाई केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच कुपवाडामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मूळचे साताऱ्याचे असलेले कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते.
