छत्तीसगडमध्ये चार महिला माओवादी ठार

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत चार महिला माओवादी ठार झाल्या असून माओवाद्यांचा नेता गंभीर जखमी झाला आहे.

गादिरास जंगलात माओवाद्यांचा ‘डिव्हिजनल’ स्तरावरचा नेता आयतू हा लपल्याची खबर सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर या जंगलात विशेष कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दलाने विशेष मोहीम राबवून परिसराला वेढा घातला.

नागलगुडा भागात माओवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. यावेळी माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार महिला माओवादी ठार झाल्या.

त्यांच्याकडून १२ बोअरच्या दोन बंदुका, ४४ राऊंड, ३०३ रायफल, १९ हजार रोख, सोलर प्लेट, रेडिओ, माओवाद्यांचा गणवेश व कागदपत्रे हस्तगत केली आहेत, अशी माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक एस. आर. पी. कल्लुरी यांनी दिली. ही चकमक दोन तास चालली.

या चकमकीत ठार झालेल्या चार माओवादी महिलांची ओळख पटली असून रामे, सन्नी, मासे व पंडी अशी त्यांची नावे आहेत, असे कल्लुरी यांनी सांगितले.

आयतू हा माओवाद्यांच्या दर्भा विभागाचा नेता असून त्याच्याकडे मलनगीर विभागाची जबाबदारी आहे. त्याने अनेक भीषण हत्याकांडं घडवली आहेत. २०१३ मध्ये जिराम खो-यात झालेल्या हत्याकांडात ३१ जणांची हत्या केली होती. यात राज्यातील कॉँग्रेसचे अनेक नेते मारले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *