बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आमिर खानचा चालक अब्दुल रौफ खान हा अपघातादरम्यान गाडी चालवत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ही घटना शुक्रवारी म्हणजे 20 तारखेला घडली. आमिर खान राजपुरीहून पाचगणीकडे शूटिंगसाठी जात असताना खिंगर-राजपुरी रस्त्यावर जन्नीमाता मंदिराशेजारी हा अपघात झाला. मनोज तुकाराम गोळे असे अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे नाव असून त्याच्या हात, पाय आणि तोंडाला मार लागला आहे. अपघातानंतर आमिर खानच्या सहकारी स्थानिकांच्या मदतीने मनोज यांना हॉस्पिटलला घेऊन गेले.
मनोज गोळेंना ज्या गाडीने धडक दिली, ती गाडी आमिर खानची आहे, याबाबत कुणालाही माहिती नव्हती. मात्र, आमिर खान जेव्हा जखमी मनोज गोळेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तेव्हा सर्वांना समजले.