मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचे ‘अच्छे दिन’ सुरु आहेत. डबल सीट, दगडी चाळ नंतर आता ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीतनाटकावर आधारीत चित्रपटाने पहिल्याच आठडयात तब्बल सात कोटींची कमाई केली आहे.
बॉलिवुडच्या गल्लाभरु सिनेमांपेक्षा सर्वच आघाडयांवर सरस असलेल्या चांगल्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकही भरभरुन प्रतिसाद देत आहेत. सुबोध भावे यांचे पहिलेच दिग्दर्शन असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटावर प्रेक्षकांनीही आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे.
शंकर, एहसान, लॉय यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून, स्वत:हा शंकर महादेवन यांनी या चित्रपटात भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी भव्य-दिव्यतेत कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.
राजेशाहीचा काळ पडद्यावर आणताना त्यातील भव्य-दिव्यतेला कुठेही धक्का लागू दिलेला नाही. या चित्रपटाबरोबरच सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई २ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटही तरुणाईला आवडला असून, प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे.