मिसबाह काद्रीला मुस्लिम असल्याने नाही तर आवश्यक कागदपत्र नसल्याने घर नाकारण्यात आल्याचा दावा, ब्रोकरने केला आहे. मुस्लिम असल्याने मुंबईत घर नाकारल्याचा आरोप 25 वर्षीय मिसबाह काद्री या तरुणीने केला होता.
मिसबाहला घर नाकारल्याने ब्रोकरच आरोपीच्या पिंजऱ्यात सापडला आहे. मात्र तिने केलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा ब्रोकरने केला आहे. शिवाय आवश्यक कागदपत्रे न दिल्याने मिसबाहविरोधात 16 एप्रिल रोजी तक्रार दाखल केल्याचंही ब्रोकरने सांगितलं.
वडाळा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सयाजीराव फडतरे यांच्या माहितीनुसार, आवश्यक सर्व कागदपत्रे न दिल्याने 16 एप्रिल रोजी फ्लॅटच्या ब्रोकरने मिसबाहविरोधात तक्रार दाखल केली होती. परंतु तिच्याविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
तर मुस्लिम तरुण किंवा तरुणींना फ्लॅट देण्यास बिल्डर किंवा तिथल्या रहिवाशांना काही हरकत नसल्याचं दिसत आहे, असं पोलिस उपायुक्त किरण चव्हाण यांनी सांगितलं.
फडतरे यांच्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये तीन मुस्लिम कुटुंब राहत असून त्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत. शिवाय इथे सहा महिन्यांपासून कोणत्याही अडचणीशिवाय राहत असल्याचंही एका मुस्लिम कुटुंबाने सांगितलं. तर मिसबाहच्या आरोपांमुळे धक्का बसल्याचं त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एक मुस्लिम महिलेने सांगितलं.
बिल्डिंगचे सुपरव्हायजर राजेश नसनोळकर यांनी सांगितलं की, बिल्डिंगमध्ये मुस्लिमांना किंवा अल्पसंख्यांना राहण्यास मनाई नाही. उलट या इमारतीत काही ख्रिश्चन कुटुंबही राहतात. हे प्रकरण ब्रोकर आणि भाडेकरुमधील आहे, यात बिल्डरचा संबंध नाही.
मात्र ब्रोकरने कागदपत्रांमुळे नाही तर मुस्लिम असल्याने घर नाकारल्याच्या आरोपावर मिसबाह काद्री ठाम आहे. मला वेबसाईटवर या फ्लॅटबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर ब्रोकरला पैसे देणं टाळण्यासाठी मी थेट तिथे राहत असलेल्या दोन मुलींशी संपर्क साधला. पण मी ज्या दिवशी म्हणजेच 6 एप्रिलला तिथे राहायला गेले, तेव्हा ब्रोकरने सांगितलं की, इथे मुस्लिमांना राहण्यास मनाई आहे, असं मिसबाहने स्पष्ट केलं.