शाळकरी मुलांचे वय हे वाढीचे असते. मुलांची वाढ झपाटयाने होत असल्याने त्यांना सकस आहाराची अधिक गरज असते. पण टीव्ही, खेळणे, व्हीडिओ गेममध्ये मुले इतकी गुंतलेली असतात की, खाण्याकडे त्यांचे साफ दुर्लक्ष होते.
टीव्ही पाहताना, खेळून आल्यावर त्यांना वेफर्स, चॉकलेट, बिस्कीटच हवे असते. मग त्यांच्या आहाराची काळजी वाटणे साहजिक आहे. त्यामुळे त्यांना संतुलित, चविष्ट, पौष्टीक आहार देणं गरजेचं आहे. दररोजचे जेवण जेवायला मुलांना कंटाळा येतोच. त्यामुळे आठवडयातून दोन-तीनदा त्यांच्या आवडीचे जेवण द्यायला हरकत नाही.
मुलांना डब्यात नियमित चपाती-भाजी देत राहाच पण सोबत चपाती-भाजी, कडधान्य, पालेभाज्या, फळे या जिन्नसांमध्ये थोडा प्रयोगही करा. जेणेकरून भाज्या-फळातील जीवनसत्त्वे त्यांच्या पोटात जातील. मुलांना पौष्टीक पण चवीलाही स्वादिष्ट खाऊचा डबा देण्याची सुरुवात यंदा बालदिनापासून करा. १४ नोव्हेंबर रोजी साज-या केल्या जाणा-या बालदिनाच्या निमित्ताने आम्ही खाऊच्या सोप्या, पौष्टीक आणि रुचकर पाककृती घेऊन आलो आहोत.
चपातीचा रोल
चपाती-भाजीचा कंटाळा करणाऱ्यांसाठी ‘चपातीचा रोल’ उत्तम पर्याय आहे. चपातीचा रोल बनवण्यासाठी कोणत्या वेगळ्या सामग्रीची गरज नाही. गरम तव्यावर थोडं तूप लावावं. या तुपात तयार चपातीच्या दोन्ही बाजू भाजून घ्याव्यात. मग चपातीच्या मधोमध भाजी ठेवावी. भाजीत थोडा सॉस मिक्स करू शकतो तसेच किसलेले चिजही टाकू शकतो. मग चपातीचे दोन्ही कडा गुंडाळत याव्यात. दोन्ही बाजू तव्यावर पुन्हा भाजून घ्याव्यात. मुलांना डब्यात अख्खा रोल किंवा त्याचे काप करत देऊ शकता. या रोलसोबत काकडी, टोमॅटोचे कापही छान लागतील.
घरगुती पिझ्झा
पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम पिझ्झा बेस आवश्यक आहे. पिझ्झा बेस शक्यतो मैद्याचा घेऊ नये. मैदा पचण्यास जड असल्याने मुलांना पोटदुखी होऊ शकते. बाजारात अलीकडे गव्हाच्या पिठाचे पिझ्झा बेस मिळू लागले आहेत. त्यामुळे हा पिझ्झा बेस घेण्यास हरकत नाही. पिझ्झावर टॉपिंग्स मुलांच्या आवडीचे घेऊ शकतो.
टोमॅटो सॉस तर हवाच. बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, कोबीचा वापर करत टॉपिंग्स बनवून ते तव्यात तेलात भाजून घ्यावेत. पिझ्झा बेसवर सॉस पसरवत मग त्यावर भाजीचे टॉपिंग्स पेरावेत. वरून भुरभुरण्यासाठी चिझ, पनीरचा वापरही करू शकतो. पॅनमध्ये पिझ्झा तयार करावा. पनीर, चिझ मुले आवडीने तर खातात सोबत टोमॅटो, कोबी अशा भाज्याही मुलांच्या पोटात जातील.
हेल्दी सँडविच
सँडविच म्हटलं की डोळ्यांसमोर ब्रेडच्या दोन स्लाईसमध्ये चिरलेले टोमॅटो, बटाटा, कांदा, बीट, चवीसाठी लावलेली चटणी, बटर असे जिन्नस डोळ्यांसमोर येतात. पण या सँडविचला थोडे हेल्दी रूप आपण देऊ शकतो. कांदा, बटाटा, टोमॅटोऐवजी सँडविचमध्ये उकडलेली कडधान्य वापरावीत. मैद्याच्या ब्रेडऐवजी गव्हाचा ब्रेड घ्यावा. तूप लावत त्याला तव्यावर थोडे भाजून घ्यावे.
मोड आलेले, उकडलेले कडधान्य एकत्र करत त्यात चवीसाठी मीठ टाकावे. आवडीसाठी चाट मसालाही घेऊ शकतो. मग हे कडधान्य ब्रेड स्लाईसमध्ये भरावे. हे हेल्दी सँडविच मुले आवडीने खातील यात काही शंका नाही.
पराठे
पालक, मेथी या हिरव्या भाज्या ताटात बघितल्या की, मुलं नाक मुरडतात. त्यामुळे त्यांची भाजी बनवण्याऐवजी त्यांना थोडे वेगळे रूप देत मुलांच्या आहारात त्याचा समावेश करावा. नेहमीप्रमाणे पराठयाची तयारी करून घ्यावी. बटाटा टाकण्याऐवजी पालक, मेथी किंवा कोबीचा वापर करावा. पराठयासोबत दही किंवा लिंबाचे गोड लोणचे द्यावे.
अंडी
अंडयात कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. इतर वेळी मुलं चिकन बर्गर, चिकन फ्रँकी खाण्यासाठी हट्ट धरतात. या बर्गर किंवा फ्रँकीमध्ये चिकनऐवजी उकडलेल्या अंडयाचा वापर करावा. टॉपिंग्ससाठी सोबत आवडीच्या भाज्यांचे मिश्रण द्यावे. हेल्दी बर्गर, फ्रँकी देताना सोबत दुधाचा ग्लासही द्यावा. म्हणजे पौष्टीक परिपूर्ण खाऊ होईल.
फळं
काही वेळा मुलांना अख्खी फळे खाण्याचा कंटाळा येतो. फळांच्या साली मुलं टाकून देतात. पण फळांचे खरे सत्त्व हे त्यांच्या सालीत असतं. त्यामुळे नुसती फळं खायला देण्याऐवजी त्याचे काप करावेत. दुधात साखर किंवा मध घालावा. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून त्यात फळांचे तुकडे टाकावे. मुलांना आवडत असेल आणि शाळेत चालत असेल तर शाळेच्या दररोजच्या खाऊच्या डब्यासोबत फळांचा रस देण्यास हरकत नाही.
फळांचा शिरा
नेहमीचा शिरा बनवताना त्यात सफरचंद, केळ यांचे काप टाकायचे. सोबत बदाम, काजू, बेदाणे, केसर यांचा वापर केल्यास सुक्यामेव्यातील सत्त्वही मुलांच्या पोटात जातील.