पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 नोव्हेंबरपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (असीआन) तेराव्या शिखर परिषदेला आणि दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.
परराष्ट्र खात्याचे सचिव (पूर्व) अनिल वधवा यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पतंप्रधान मोदी 21 नोव्हेंबर रोजी क्वालालंपूर येथे दोन्ही परिषदांना उपस्थित राहण्यासाठी दाखल होतील. त्यानंतर द्विपक्षीय भेटी झाल्यावर पंतप्रधान मोदी पुढे सिंगापूरला रवाना होतील.
मलेशियाचे पंतप्रधान मोहंमद नजीब बिन तुन हाजी अब्दुल रझाक हे या दोन्ही परिषदांच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी असीआन आणि पूर्व आशियाई परिषदांमधील सहभागी देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.