पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील 7 रेसकोर्स रस्त्यावरील निवासस्थानाजवळ बुधवारी रात्री दिल्ली पोलिसातील कॉन्टेबलकडून चुकून गोळीबार झाल्याची घटना घडली.
पोलिस उपअधीक्षक जतीन नरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या निवासस्थानजवळ बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. एका कॉन्टेबलच्या एके-47 रायफलमधून तीन गोळ्या चुकून उडाल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. बुधवारी रात्री ड्युटी बदलत असताना ही दुर्घटना घडली.
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पार्किंगच्या ठिकाणी ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी सावध झाले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी कॉन्स्टेबलच्या हातून मिसफायरिंग झाल्याचे लक्षात आले. मात्र या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.