सलमान खान आणि राजश्री प्रोडक्शन म्हणजे हिट चित्रपट हे समीकरण ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातही कायम आहे. सलमानची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ने प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसातच १०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.
दिवाळीच्या तिस-या दिवशी गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४०.३५ कोटींचा गल्ला जमवला. शुक्रवारी या चित्रपटाने ३१.०५ कोटींची कमाई केली. शनिवारी ३०.०७ कोटी कमावले. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण १०१.४७ कोटींची कमाई केली आहे.
‘हम साथ साथ हैं’ चित्रपटानंतर सोळावर्षांनी सलमानने राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटात काम केले आहे. राजश्री बॅनरच्या प्रत्येक चित्रपटात सलमानचे नाव प्रेम होते. या चित्रपटातही सलमानचे नाव प्रेमच आहे.
“मैंने प्यार किया” चित्रपटापासून सलमान आणि राजश्रीचा हिट चित्रपटांचा सिलसिला सुरु झाला होता. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, या राजश्रीच्या चित्रपटांनी त्या त्या वेळी उत्पनाचे आणि लोकप्रियतेचे नवे उच्चांक नोंदवले होते.