दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही थंडीची चाहूल जरा उशिराच लागली आहे. नोव्हेंबर महिना अर्धा उलटला असून आता सर्वत्रच गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे खास थंडीच्या उबदार कपडय़ांच्या खरेदीसाठी ग्राहकवर्ग बाजारपेठेत दाखल झाला असून खास हिवाळय़ासाठी उबदार कपडय़ांच्या खरेदीला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
या थंडीच्या महिन्यात लोक लाकडाची शेकोटी पेटवून हात शेकत गर्मीचा अनुभव घेतात. थंडीमध्ये गर्मीचा आनंद द्विगुणित करतात ते हिवाळ्यातील उबदार कपडे! थंडी आली की दुकान, मॉल्स एव्हाना रस्त्यावर कपडे विकणारे विक्रेते उबदार कपडय़ांनी संपूर्ण बाजारपेठ सजवून टाकतात. विविध, रंगीबेरंगी उबदार कपडय़ांनी विक्रेते ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत असतात. या थंडीची चाहूल लागल्याने आता उबदार कपडय़ांच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे वळताना दिसत आहेत.
उबदार कपडे बाजारपेठेत दाखल झाले की, ग्राहकांची कपडे खरेदीसाठी एकच झुंबड उडते. ग्राहकांची मागणी लक्षात घेता विक्रेते लहान मुलांपासून ते ज्येष्ठांना आवडतील व सहजरित्या वापरू शकतील असे कपडे उपलब्ध करून देतात. यामध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर, स्लिव्हलेस स्वेटर, मफलर, कानटोपी, कानपट्टी यांचा समावेश असतो. तर, तरुणांसाठी जॅकेट, झीपर, प्रिंटिंग मंकीकॅप, हँडग्लोज तसेच जाड कापड असलेले स्टायलिस्ट कपडे आदींची मागणी आहे. मुलीही या बाबतीत मागे नाहीत, लाईट रंगाच्या व झुबकेदार केसाळ असलेल्या लांब स्वेटरना अधिक पसंती देताना दिसतात. थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या कपडय़ांवर विशेष लक्ष दिले जाते. संपूर्ण अंग झाकेल असे उबदार कपडे ग्राहक खरेदी करतात. यामध्ये विशेषत: लहान मुलांसाठी कार्टुनचे चित्र असलेली कानटोपी! थंडीच्या दिवसात पायांना उब मिळावी म्हणून मोजेही खरेदी केले जातात.
सध्या ग्राहकांना जाहिरातीच्या माध्यमातूनही थंडी हंगामासाठी कोणते कपडे खरेदी करावे याचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे ग्राहक थेट दुकानात गेले की, त्याच कपडय़ांची मागणी करतात. तर काही ग्राहक आपल्याला शोभून दिसतील असेच हिवाळी कपडे खरेदी करतात. सध्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनेही आपापल्या वेबसाईटवर ग्राहकांना स्वेटर उपलब्ध करून दिले आहेत. पुरुष, स्त्रिया व लहान मुलांसाठी शॉपिंग वेबसाईटने ऑनलाईन स्वेटर विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर १५०० रुपये किमतीपर्यंत पुरुषांचे स्वेटर उपलब्ध आहेत. यामध्ये स्लिव्हलेस स्वेटर, फूल हात स्वेटर, बंद गळ्याचे स्वेटर, झीपर स्वेटर इत्यादी प्रकारचे स्वेटर वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत. तर, महिलांच्या स्वेटरच्या किमती या ३०० पासून असूृन वेगवेगळ्या डिझाईन्सचे रंगीत स्वेटर उपलब्ध आहेत. बाजारात ही ३००-३५० पासून ५००० पर्यंतच्या किमतीतही स्वेटर उपलब्ध आहेत. ट्रेनमध्येही ग्राहकांना थंडीच्या उबदार कपडय़ांचे साहित्य उपलब्ध होते. कानपट्टी, कानटोपी यांसारखे थंडीपासून रक्षण करणारे लहान-लहान कपडेही लोकल ट्रेनमध्ये ग्राहकांसाठी विक्रेते आणतात. थंडी जोर धरण्याअगोदरच लोकांची हिवाळी-खरेदीची सुरुवात झालेली दिसत आहे.