शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तिस-या पुण्यतिथीचे निमित्त साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेची घोषणा केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्माकाची जागा अखेर निश्चित झाली असून, दादर शिवाजीपार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन स्मृतिस्थळाच्या जागेची घोषणा केली.
शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. शिवाजीपार्कचे मैदान बाळासाहेबांनी आपल्या सभांनी गाजवले होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजीपार्क मैदानातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
सुरुवातीला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवरुन वाद सुरु होते. शिवसेनेला काही पर्यायही देण्यात आले होते. मात्र शिवाजी पार्कबरोबर बाळासाहेबांचे असणारे नाते लक्षात घेता शिवसेना शिवाजी पार्क परिसरातील जागेसाठी आग्रही होती. अखेर महापौर बंगल्याची जागा या स्मारकासाठी निश्चित करण्यात आली आहे.