पॅरिसवर भीषण दहशतवादी हल्ला करणा-या इसिस या दहशतवादी संघटनेच्या सिरीयातील तळांवर रविवारी रात्री फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी जोरदार हवाई हल्ला केला.
फ्रान्सच्या १२ लढाऊ विमानांनी सिरीयातील रक्का शहरावर तुफान बॉम्बफेक केली. इसिसने सध्या रक्का शहराला आपली राजधानी बनवले आहे.
पॅरिसवर झालेल्या हल्ल्यानंतर दोनच दिवसात फ्रान्सने मोठा हल्ला करुन, येणा-या दिवसांमध्ये इसिस विरोधातील कारवाईची धार अधिक तीव्र करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
इसिसने शुक्रवारी रात्री पॅरिसवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १३२ निरपराध नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यानंतर फ्रान्सने दहशतवादा विरोधात कोणतीही दयामाया न दाखवता निष्ठुरतेने लढाई लढू असे म्हटले होते.
फ्रान्सचे अणवस्त्र हल्ला करु शकणारे चार्ल्स डी हे विमानही इसिस विरोधी युध्दासाठी सज्ज होत आहे. त्यामुळे येणा-या दिवसात इसिसच्या तळांवर यापेक्षाही मोठे हवाई हल्ले होणार आहेत.
सिरीयात इसिस विरोधी युध्दात सहभागी झाल्यानंतर फ्रान्सने रविवारी रात्री केलेला हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला होता. फ्रेंच लढाऊ विमानांनी रविवारी रात्री इसिसच्या तळांवर २० बॉम्ब फेकले. हवाई हल्ल्यामध्ये इसिसचे अतिरेकी भरती केंद्र आणि शस्त्रास्त्र, दारुगोळयाचे गोदाम उध्वस्त झाल्याचे फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.