कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अश्विनी रामाने यांनी 11 मतांनी विजय मिळविला. तर, उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांनी विजय मिळविला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोल्हापूर महानगरपालिकेत आघाडी केली असून, काँग्रेसच्या अश्विन रामाने यांची महापौरपदी निवड झाल्याने सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी काम पाहिले. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित होते. अश्विनी रामाने यांना 44 मते मिळाली, तर भाजपच्या सविता भालकर यांना 33 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही मुल्ला यांना 44 मते मिळाली. त्यांनी भाजप-ताराराणी युतीचे उमेदवार राजेंद्र शेळके यांचा पराभव केला.
महापौर निवडीत कोणताही धोका पोचू नये यासाठी दोन्ही कॉंग्रेसने 44 सदस्यांना सहलीवर नेले होते. आज (सोमवार) सकाळी अकरा वाजता महापौर निवडीच्या प्रक्रियेस सुरवात होण्यापूर्वी सदस्य महापालिकेत दाखल झाले. कॉंग्रेसचे 27, राष्ट्रवादीचे 15 आणि अपक्ष दोन असे एकूण 44 सदस्यांनी अश्विनी रामाने यांना मतदान केले. बहुमताचा आकडा 41 इतका होता.