शेअर बाजारात आठवड्याची सुरूवात निराशाजनक झाली असून, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात प्रत्येकी 0.40 टक्के घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 25,450 पातळीपर्यंत खाली आला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 7750 या मुख्य आधार पातळीच्या खाली पोचला आहे. पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देखील शेअर बाजारावर उमटले आहे. शेअर बाजार सुरू होताच बाजाराची नकारात्मक सुरूवात झाली.
सध्या (10 वाजून 05 मिनिटे) सेन्सेक्स 25,486.12 पातळीवर व्यवहार करत आहे. त्यात 124.41 अंशांची घसरण झाली आहे. तर निफ्टी निर्देशांकात 40.70 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी 7,721.55 पातळीपर्यंत खाली आला आहे. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात खरेदीचा उत्साह बघायला मिळतो आहे. दोन्ही निर्देशांक किरकोळ वधारले आहेत. क्षेत्रीय पातळीवर आयटी आणि मेटल क्षेत्रात घसरण झाली आहे. आयटी निर्देशांकात 1.4 टक्के तर मेटल निर्देशांकात 1 टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. इतर क्षेत्रात एफएमसीजी, फार्मा आणि कंज्यूमर ड्युरेबल्स निर्देशांक मात्र वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजारात आज (सोमवार) आयटीसी, अदानी पोर्ट्स, डॉ रेड्डी यांच्या, पीएनबी, येस बँक, एसबीआय, सन फार्मा आणि सिप्ला यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर, इन्फोसिस, कोल इंडिया, ओएनजीसी, विप्रो, एचसीएल टेक आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.