भारतीयांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटेनने परत करावा, यासाठी इंग्लंडमधील भारतीयांनी इंग्लंडमधील न्यायालयात धाव घेतली आहे. कोहिनूर हा हिरा भारतात परत आणण्यासाठी भारतातील उद्योजक आणि सिनेकलाकारांनी चांगलीच कंबर कसली आहे. या हि-यासाठी त्यांनी लंडन न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे ठरवले आहे. हा हिरा १०५ कॅरेटचा असून याची किंमत १० दशलक्ष पौंड आहे.
१९३७ मध्ये झालेल्या सहावा किंग जॉर्जच्या राज्यभिषेकावेळी त्याच्या मुकुटावर हा हिरा लावण्यात आला होता. यानंतर राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेकावेळी तिच्या मुकुटावर हा हिरा लावला होता.
‘माऊंटन ऑफ लाईट’ या संस्थेने कोहिनूर हा भारतातून चोरून नेल्याचा दावा केला आहे. याचबरोबर त्यांनी हा हिरा परत करावा, अशी मागणी इंग्लंड सरकारजवळ केली. कोहिनूर हा भारतातून चोरून इंग्लंडला आणला यात काही शंका नाही, असे मत ‘माऊंटन ऑफ लाईट’चे सभासद डेव्हिड सुझा यांनी व्यक्त केले. ब्रिटिशांनी भारतीयांमध्ये फूट पाडून भारताची संपत्ती चोरी केली आहे, असेही सुझा म्हणाले. कोहिनूर हिरा ब्रिटिशांनी शीख पंथाचे शेवटचे अधिकारी दुलीप सिंग यांच्याकडे सोपवला होता.
हा हिरा फक्त १०५ कॅरेटचा दगड नसून तो आमच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे इंग्लंड सरकारने तो नि:संशयपणे परत केला पाहिजे, असे मत बॉलिवूड अभिनेत्री भूमिका सिंग हिने मांडले.
‘माऊंटन ऑफ लाईट’ या संस्थेने ब्रिटीश वकिलांना होलोकॉस्ट या कायद्यानुसार आम्ही खटला चालवणार आहे अशी सूचना केली आहे. इंग्लंड सरकारच्या होलोकॉस्ट या कायद्याअंतर्गत जर इंग्लंडने एखाद्या देशाची सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक वारसा जतन करणारी वस्तू चोरली असेल तर या कायद्याअंतर्गत ती वस्तू परत मिळवता येते.
इंग्लंडमधील रुबिक लुईस किंगचे भागीदार व वकील सतीश झाकू यांनी चोरीप्रकरणी खटला चालवणार असल्याचे माहिती दिली. जर या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर आंतरराष्ट्रीय न्यायालयातही दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रिटीश संग्रहालयात असलेल्या ‘एल्गिन मार्बल्सच्या’ मालकी हक्कासाठी इंग्लंड आणि ग्रीसमध्ये वादविवाद सुरू आहे. एल्गिन मार्बल ही ग्रीसची प्राचीन संस्कृती आहे. त्यामुळे इंग्लंडने हा एल्गिन मार्बल परत करावा, अशी मागणी ग्रीसने केली आहे.
हा रत्नजडित हिरा फक्त स्त्रिया आणि देवच घालू शकतात किंवा त्यांच्या मुकुटावर हा हिरा लावला जाऊ शकतो. पण जर हा हिरा एखाद्या पुरुषाने परिधान केला तर त्या व्यक्तीला गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. असे आख्यायिकेत म्हटले आहे. हा हिरा राणी अलेंक्झांड्रा आणि राणी मेरी यांच्या मुकुटावर लावला होता. २००२ मध्ये जेव्हा या राणीचे दफन करण्यात आले तेव्हा हा हिरा राणीच्या आईच्या मुकुटावर लावला. दरम्यान, या हि-यांबाबत केलेला दावा इंग्लंड न्यायालयाने फेटाळून लावला आहे.