ब्राझीलमध्ये गुरुवारी खाणीलगत असलेले धरण कोसळल्याने लगतच्या गावात चिखलाचा पूर आला होता. त्यामुळे येथील बरीच गावे उद्ध्वस्त झाली आहेत. या धरणफुटीमध्ये पंधरा जण ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले असून ४५ जण बेपत्ता असल्याची माहिती बचाव पक्षाच्या अधिका-यांनी दिली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत २ जण ठार झाले आहेत. बचावकार्य वेगाने सुरू असून रस्त्यावर साचलेला चिखल दूर करून चिखलात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बचावकार्यादरम्यान मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्यादरम्यान सापडलेल्या ३० जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. असे अग्निशामक दलाच्या प्रवक्त्यानी सांगितले.
या पुरात मृतांची संख्या वाढण्याचा संभव आहे. आम्ही सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु चिखलाच्या ढिगा-याखाली अनेक लोक, घरे गाडली गेली आहेत. चिखलाचा ढिगारा हलवण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.
आम्ही खात्रीशीर मृतांची संख्या सांगू शकत नाही मात्र ढिगा-याखाली सापडलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. बचावकार्यात सापडलेल्या जखमींना हवाईमार्गाने ऑरो पेट्रो येथील रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या कनिष्ठ अधिकारी अॅडो सेवेरिनो यांनी दिली. या दुर्घटनेत बहुतेक जण खाणीत काम करणारे असण्याची शक्यता आहे.