दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण ताजी करणारी घटना बंगळुरुमध्ये घडली आहे. बंगळुरुच्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये धावत्या बसमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पिडीत तरुणी बसमध्ये एकटी असल्याचे पाहून चालक आणि वाहकाने या तरुणीवर बलात्कार केला. सुलीबेली होस्कोट जवळ ही घटना घडली. पिडीत तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. दोन्ही आरोपींची ओळख पटली असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
अत्याचार केल्यानंतर आरोपी रवी आणि मंजुनाथन पिडीत तरुणीला नागागोंडा रस्त्यावर टाकून तिथून पसार झाले. मागच्या काही महिन्यांमध्ये बंगळुरुमध्ये महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे मोठया प्रमाणावर वाढले आहेत.