तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रात तूरडाळीचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यावेळी डाळीच्या उत्पादनाबद्दल महाराष्ट्रला पुरस्कारही मिळाला होता.
या वर्षी डाळीचे वाढलेले भाव चिंताजनक आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले. इतकेच नव्हे तर तुरीचे उत्पादन करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत मुख्यमंत्र्यांची शाळाही पवार यांनी यावेळी घेतली. फडणवीस यांनी हा ‘पाहुणचार’ स्वीकारल्यावर, पवार यांचा सल्ला मोलाचा असल्याचे सांगत वेळ मारून नेली.
बारामती येथे ११० एकरामध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद पवार, कृषिमंत्री एकनाथ खडसे, अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर होते. पवार यांनी डाळीच्या महागाईवर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की, तीन वर्षापूर्वी डाळीचे विक्रमी उत्पादन झाले होते.
त्याबद्दल राज्याला पहिले पारितोषिक मिळाले होते. सणासुदीला घरा-घरामध्ये डाळीचीच चर्चा होत आहे. असा गंभीर प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर शेतक-यांना योग्य बियाण्यांचे वाण उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यानंतर फडणवीस यांनी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे सांगत बाजू सावरली.