तूरडाळ बुधवारपासून १२० रुपये किलो मिळणार अशी शिवसेनेने केलेली घोषणा ही लोणकढी थाप ठरली असून शिवसेनेचे नाटक क्रमांक दोन सपशेल फसले आहे. डाळी कमी दराने विकण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेशही व्यापा-यांनी सपशेल धुडकावून लावल्याचे बुधवारी सर्वत्र दिसून आले.
या फसवणुकीमुळे शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर केल्याप्रमाणे १२० किलो दराने तूरडाळ नेमकी कुणाच्या घरात गेली, असा सवाल भडकलेले सर्वसामान्य विचारत आहेत. बुधवारी मुंबईच्या विविध भागांतील किराणा मालाच्या दुकानांना भेटी देऊन माहिती घेतली असता अद्यापही तूरडाळ १८० ते २०० रुपये किलो दरानेच विकली जात असल्याचे वास्तव समोर आले.
ही फसवणूक महागाईने संत्रस्त जनतेच्या जिव्हारी लागली असून, सरकारने जप्त केलेली २५ लाख टन तूरडाळ नेमकी गेली कुठे? असा सवालही लोक आता विचारू लागले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचा कलगीतुरा रंगल्यानंतर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डाळींचे भाव कमी करण्याची मागणी करण्याचे नाटक केले. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून बुधवारपासून तूरडाळ १२० किलो दराने मिळेल, अशी बातमी शिवसेनेच्या मुखपत्रात मोठया थाटात बुधवारी ठळकपणे देण्यात आली.
मात्र बुधवारी कोणत्याही दुकानात तूरडाळ १२० रुपये किलो दराने मिळत नसल्याचे निष्पन्न झाल्याने कल्याणमधील राजीनामा नाटकाप्रमाणेच शिवसेनेचे नाटक क्रमांक दोन सपशेल फसले, असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेले तथाकथित आदेशही व्यापा-यांनी धुडकावून लावण्याचे दिसून आले आहे.
तूरडाळ आजपासून १२० किलो दराने मिळणार अशी बातमी वाचून अनेक गृहिणी बुधवारी तूरडाळ विकत घेण्यासाठी किराणा मालाच्या दुकानात गेल्या होत्या. मात्र त्यांचा सपशेल अपेक्षाभंग झाला. तूरडाळ १८० ते २०० रु. प्रती किलो भावानेच सर्व दुकानांमध्ये विकली जात होती. वांद्रे, खार, दिंडोशी, माहीम, दादर, डोंबिवली, कामोठे अशा विविध ठिकाणी
‘प्रहार’च्या प्रतिनिधींनी किराणा मालाच्या दुकानात जाऊन दराबद्दल चौकशी केली असता काही दुकानात २०० रु. प्रती किलो दरानेही तूरडाळ विकली जात असल्याचे निदर्शनास आले. शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणाही निव्वळ थाप निघाल्याचा संताप सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.
एनएम जोशी मार्ग परिसर, स. ११ वाजता एनएम जोशी मार्ग परिसरातील किराणा दुकानांमध्ये तूरडाळ दोनशे रुपये किलोच्या घरातच होती. सकाळी अकराच्या सुमारास तिथे विचारणा केली असता, हल्कावाला १८० रुपया. असे सांगण्यात आले. दुकानावर आलेल्या काही गृहिणी त्यामुळे बुचकाळ्यात पडल्या होत्या. दुकानदाराशी त्यांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला.
सरकारने बोला है आजसे भाव कम होगा, १२० रुपये किलोसे दाल मिलेगा, असे त्यांनी सांगितले खरे पण, दुकानदाराने त्यांना त्याचे भाव सांगत उडवून लावले. परळच्या एन.एम. जोशी मार्गावर असणा-या किरकोळ कडधान्य विक्रेत्यांच्या दुकानात सध्याच्या दरांतच विक्री सुरु होती. विक्रेत्यांच्या मते सरकारकडून घोषणा करण्यात आली असली तरी देखील दिवाळीमधील ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन चढयादराने डाळ खरेदी केली आहे.
ही डाळ १२० रुपये किलो दराने विकणे शक्यच नाही. त्याऐवजी न विकलेली अधिक योग्य राहील असेही काहींनी सांगितले. काही विक्रेत्यांनी तर तुरडाळ विकणेच बंद केले आहे. शिवाय किरकोळ व्यापारात उतरलेल्या बडया उद्योजकांकडे अद्याप डाळीचा मोठा साठा असल्याचा आरोपही विक्रेते करीत आहेत.
एल्फिन्स्टन रोड, परळ परिसरात ग्राहकांचा अपेक्षाभंग
बुधवारपासून तुरडाळ १२० रु. प्रती किलो दराने विकली जाणार असल्याची घोषणा ऐकताच सर्वसामान्यांच्या चेह-यावर दिलासादायक भाव उमटले. गिरणगावातील किराणा दुकानांमध्ये परिसरातील महिलावर्गाने धाव घेतली होती. दुकानदार १६०-१८०-२०० रु. प्रती किलो दरानेच तूरडाळ विकत असल्याने ग्राहकांच्या चेह-यावर संभ्रमाचे भाव दिसत होते.
काही ग्राहकांनी १२० रु. दराने तूरडाळ विकण्याच्या निर्णयाबाबत विक्रेत्याला विचारपूस केली असता ‘सध्याचा तूरडाळीचा साठा चढया दरानेच मार्केटमधून विकत घेतला आहे. तो १२० रु. भावाने कसा विकायचा? आम्हाला तोटा होईल’ अशी उत्तरे त्यांना मिळत होती.
आमच्याकडे हाच भाव आहे, पाहिजे तर घ्या, असेही काही दुकानांत ग्राहकांना सांगण्यात आले. त्यामुळे काही ग्राहक जण रिकाम्या हाताने परतले तर अनेकांनी सरकारच्या फसवेगिरीविरोधात लाखोली वाहिली.
व्यापारी म्हणतात, चढया भावाने घेतलेली डाळ स्वस्त कशी विकणार?
बाजारातील तूरडाळीचे भाव वाढलेले असताना आम्ही खरेदी केलेली आहे. त्यामुळे त्याच्या पटीतच आम्हाला डाळ विकावी लागणार आहे. सरकारने १२० रु. किलो दराने डाळ विकण्याचे आदेश काढल्याचे आम्हाला काहीही माहीत नाही.
तसे आदेश काढले असले तरी आम्हाला होणारा तोटा कोण भरून देणार, असा सवाल एन. एम. जोशी मार्गावरील ‘महाराष्ट्र ग्रेन’ या दुकानाचे मालक अतुल ताराणे यांनी केला. तर सद्य:स्थितीत १२० रुपये किलो दराने डाळ विकणे शक्य नाही. तशी जबरदस्ती केली तर डाळीची विक्रीच आम्हाला थांबवावी लागेल, असे ‘मुरजी चापसी अॅण्ड कंपनी’चे मनसुखभाई गडा यांनी सांगितले.