पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी रात्री अरबी समुद्रात कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील वैमानिक ई. सॅम्युअल आणि सहवैमानिक टी. के. गुहा हे दोघे समुद्रात बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
ओएनजीसीच्या मुंबई हायजवळील ऑइल रिंग प्रकल्प परिसरात अंधारात उतरण्याचा सराव सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे हा अपघात झाल्याचे ओएनजीसीचे संचालक टी. के. सेनगुप्ता यांनी सांगितले. मुंबईच्या किना-यापासून १६९ किमीच्या अंतरावर हा अपघात झाला.
नौदलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राहुल सिन्हा यांनी हेलिकॉप्टरला जलसमाधी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नौदलाने अपघाताचे वृत्त समजताच एक हेलिकॉप्टर, नाइट व्हीजन असलेले विशेष हेलिकॉप्टर आणि दोन युद्धनौका तातडीने घटनास्थळी रवाना केल्या.
रात्री उशीरा हेलिकॉप्टरचे काही अवशेष बचाव पथकाला समुद्रात तरंगताना आढळले. मात्र वैमानिकांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. नौदलातर्फे वैमानिकांचा शोध सुरू आहे.