एकिकडे सरकारी कर्मचारी अजूनही सानुग्रह अनुदानाच्या प्रतिक्षेत असताना बदलापूरच्या रिक्षाचालकांना मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही भरघोस बोनसचे वाटप करण्यात आले आहे.
या बोनस वाटपाचे यंदाचे हे अकरावे वर्ष असून यावर्षी रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सुमारे २१ लाख रुपये बोनस म्हणून वाटण्यात आले आहेत. यात बाळा म्हसकर या रिक्षाचालकाला सर्वाधिक ५६ हजार रुपये बोनस म्हणून देण्यात आले आहेत.
वर्षभर सर्वसामान्यांसाठी झटणा-या रिक्षाचालकांना दिवाळीत बोनस मिळावा आणि त्यांचीही दिवाळी चांगली साजरी व्हावी, यासाठी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश खिलारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी २००४ साली रिक्षाचालकांकडून दरमहिन्याला ठराविक रक्कम घेऊन मासिक बचत करण्यास सुरूवात केली.
ही रक्कम दिवाळीआधी रिक्षाचालकांना एकत्रितपणे देण्यात येते. त्यामुळे रिक्षाचालकांच्या हातात एकरकमी मोठी रक्कम पडल्याने त्यांना त्याचा मोठा फायदा होतो. शिवाय रिक्षाचालकांना कुणी कर्जही देत नसल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण, घरातील लग्नकार्य, आजारपणे यासाठीही ही रक्कम कामी येते.
ही बचत योजना सुरू केली तेव्हा तिला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र आता दरवर्षी रिक्षाचालकांना मिळणारा बोनस पाहून यात सहभागी रिक्षाचालकांची संख्या वाढत असल्याचे अविनाश खिलारे यांनी सांगितले. यावर्षी या योजनेंतर्गत सुमारे २५६ रिक्षाचालकांना बोनसचे वाटप करण्यात आले आहे.
यात बाळा म्हसकर यांना सर्वाधिक ५६ हजार रुपये, मनोज फाटक यांना ४० हजार रुपये, तर ज्ञानेश्वर पाटील यांना ३८ हजार रुपये बोनस मिळाला. शिवाय बोनससोबत प्रत्येक रिक्षाचालकाला संघटनेच्या वतीने दिवाळीची भेट म्हणून संसारोपयोगी वस्तूही देण्यात आल्या. या बोनस योजनेसाठी संघटनेचे अधक्ष अविनाश खिलारे यांच्यासह खजिनदार तुळशीराम घावट, चंद्रकांत शिंदे, किशोर मोहिते, सुर्यकांत चव्हाण आदी पदाधिकारी दरवर्षी मेहनत घेत असतात.