उष्णतेच्या लाटेमुळं संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. ऑक्टोबर हिटची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह संपर्ण कोकणात उन्हाचा पारा वाढतोय. महाराष्ट्रात ऑक्टोबरमधील हवामानाचे सर्व विक्रम मोडले जात आहेत. आज मंगळवारसाठीही कोकण प्रदेशात उष्ण व दमट वातावरणाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईतही तापमानाचा पारा वाढत आहे. सोमवारी सांताक्रुझ येथे कमाल तापमान 38.2 अंश हे तापमान सरासरीपेक्षा 5.1 अंशाने अधिक आहे. मुंबईत गेल्या 11 वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. 2015 नंतर प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुंबईत इतके तापमान नोंदवले गेले आहे. रत्नागिरी येथेही उष्णतेचा पारा 39.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जे मागील 143 वर्षातील सर्वाधिक कमाल तापमान असून 7.6 अंशांनी अधिक आहे.
आज मुंबई व कोकण प्रदेशात हवामान उष्ण व दमट वातावरणाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून या वेळी तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान वर्तवला आहे. राज्यातील काही दिवसांपासून सरासरीहून 2 ते 4 अंशांनी कमाल तापमानाची नोंद होत असून उष्णतेचा तडाखा कायम आहे.
राज्याच्या अंतर्गंत भागात बुधवारपर्यंत कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसंच, पुढील 4 ते 5 दिवसांत किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही, अशी शक्यता विभागाने वर्तवली आहे.
तापमानात वाढ का?
किनारपट्टीवर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं कोकणात कमाल तापमानअधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईसह कोकणातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
नागरिकांनो काळजी घ्या!
वाढत्या तापमानामुळं नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. भरपूर पाणी प्या आणि बाहेर सावलीचा आधार घ्यावा. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि उन्हात काम करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी, असं अवाहन करण्यात आले आहे.
