महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मौल्यवान खजिन्याची माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर आली आहे. देवीच्या खजिन्यात सुमारे 253 किलो सोने आणि 4,523 किलो चांदीचे दागिने असल्याची माहिती मिळाली आहे. राजे-महाराजे, विविध संस्थाने आणि लाखो भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या या दागिन्यांना धार्मिक महत्त्वासोबतच ऐतिहासिक वारसाही लाभला आहे.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान रत्नांचा समावेश
तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह माणिक, पाचू, मोती, हिरे आणि अन्य मौल्यवान खड्यांनी सजवलेल्या अलंकारांचा समावेश आहे. सोन्याच्या पादुका, मुकुट, मंगळसूत्र, कंठे, हार आणि बांगड्या अशा विविध दागिन्यांचा या खजिन्यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नवसपूर्ती झाल्यानंतर भाविकांकडून देवीला विविध प्रकारचे दागिने अर्पण केले जातात. शारदीय नवरात्रोत्सवात तसेच वर्षभरातील सण-उत्सवांच्या काळातही देवीच्या चरणी सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करण्याची परंपरा कायम आहे.
शिवरायांच्या ठशांचा उल्लेख असलेली सोन्याची मोहरांची माळ!
देवीच्या खजिन्यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तू आणि नाण्यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठशांचा उल्लेख असलेली सोन्याच्या मोहरांची माळही या खजिन्यात असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय बिकानेर, चित्रकूट आणि पोर्तुगीजांसह विविध संस्थानांशी संबंधित ऐतिहासिक नाणीही या खजिन्यात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, 17 संस्थानांशी संबंधित 71 प्रकारच्या नाण्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे तुळजाभवानी मातेचा खजिना हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो.
विविध वर्षांत दागिन्यांची मोजणी
तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील दागिन्यांची मोजणी 1663, 2009, 2018 आणि 2023 या वर्षांत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 2023 मध्ये झालेल्या मोजणीच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती अधिकारातून मिळालेल्या तपशिलामुळे देवीच्या खजिन्यातील मौल्यवान दागिने, सोन्या-चांदीच्या वस्तू आणि ऐतिहासिक नाण्यांची माहिती पुन्हा चर्चेत आली आहे.
देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविकांची उपस्थिती..
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येतात. श्रद्धेपोटी अर्पण करण्यात आलेल्या या मौल्यवान वस्तू देवीच्या मंदिराच्या समृद्ध परंपरेची साक्ष देतात. सोन्या-चांदीच्या प्रचंड साठ्यासोबतच ऐतिहासिक नाणी आणि रत्नजडित अलंकारांमुळे तुळजाभवानी मातेच्या खजिन्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
