कॅन्सरने बायको गेली, नवऱ्याचा दुसऱ्या लग्नाचा घाट, मोडता घालणाऱ्या लेकीला घरातच संपवलं, चिकन बिर्याणीतून विषबाधेचा बनाव

वडिलांच्या पुनर्विवाहाला विरोध केल्यामुळे ४५ वर्षीय पित्याने आपल्या २० वर्षीय मुलीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. बापाने मुलीला विष मिसळलेली चिकन बिर्याणी खाऊ घातली. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्याला त्याच्या दुसऱ्या मुलीचाही जीव घ्यायचा होता, परंतु त्या रात्री ती आपल्या काकांकडे राहण्यास गेल्यामुळे वाचली. ही घटना २ ऑक्टोबर रोजी वडाळा येथे घडली होती. आरोपी पिता हा व्यवसायाने कारर्पेंटर आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पित्याचा बनाव उघडकीस आला.

वडाळा पोलिसांनी बुधवारी शरीफ रझा हुसेन खान याला मुलगी रिफतच्या हत्येप्रकरणी अटक केली; त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गळा आवळून हत्या करताना ती बेशुद्ध झाली होती, असे पोलिसांनी सांगितले.

फूड पॉयझन झाल्याचा बनाव

शरीफ खानने हे प्रकरण ‘फूड पॉयझनिंग’चे (अन्नातून विषबाधा) असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांना तिच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

पत्नीचा कॅन्सरने मृत्यू

शरीफ खान हा वडाळा पूर्व येथील शेख मिस्त्री दर्गा रोडवरील मॅडोना कॉलनीत आपल्या मुली – रिफत (२०), नुझत (१६) आणि १० वर्षांचा मुलगा अहमद यांच्यासोबत राहत होता. रिफतच्या आईचा नोव्हेंबर २०२५ मध्ये कर्करोगामुळे मृत्यू झाला होता.

दुसऱ्या विवाहाला मुलींचा विरोध, पित्याशी भांडणं

शरीफ खान पुनर्विवाह करण्याच्या विचारात होता, याला रिफत आणि नुझत यांनी विरोध केला होता; यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असत. विशेषतः रिफतचा आपल्या वडिलांच्या पुनर्विवाहाला तीव्र विरोध होता, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *